पुणे: ‘राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीमुळे आरोग्य विभागाची सर्व कार्यालये एकाच छताखाली येणार आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामांना गती येणार असून, दर्जेदार पायाभूत सुविधा आणि आरोग्य सुविधा देण्यास मदत होणार आहे. यातून आरोग्य विभागातर्फे घेण्यात येणार्या निर्णयांची अंमलबजावणी करणे सोपे होऊ शकेल, असे आश्वासन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
‘कुटुंब कल्याण भवन’ येथे आयोजित राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र इमारत भूमिपूजन आणि ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’अंतर्गत राज्यातील नवीन 43 आपला दवाखान्यांचे लोकार्पण शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी आबिटकर बोलत होते. या वेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे, राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे व्यवस्थापकीय संचालक अमगोथू श्रीरंगा नायक आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, ‘मंगेशकर रुग्णालयाच्या घटनाक्रमाबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग, राज्य शासन, वैद्यकीय शिक्षण विभाग, विधी आणि न्याय विभाग यांच्या वतीने चौकशी करण्यात आली. डॉ. घैसास यांच्यावर वैद्यकीय निष्काळजीपणा केल्यामुळे कारवाई झाली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दंड ठोठावण्यात आला आहे.
’प्रस्तावित इमारतीमध्ये अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज प्रशिक्षण हॉल, व्हिडिओ कॉन्फरन्स हॉल, अभिलेख कक्ष, वाहनतळ, आदी पायाभूत सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे, या इमारतीचे काम नियोजित वेळेत पूर्ण करावे. आज लोकार्पण करण्यात आलेल्या नवीन आपला दवाखान्यांपैकी पुणे शहरात सात दवाखाने आहेत. या दवाखान्यांच्या माध्यमातून शहरी भागात झोपडपट्टीमध्ये राहणार्या गरीब नागरिकांना अधिक गतिमान आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, अशी माहिती आबिटकर यांनी दिली.
593 आरोग्य संस्थांमध्ये यांत्रिक वस्त्रधुलाई सेवा केंद्र लवकरच सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने रुग्णालयांमध्ये स्वच्छता, आहार आणि रुग्णालयात वापरल्या जाणार्या वस्त्रांची स्वच्छता हे अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत. त्यामुळे राज्यातील 8 परिमंडलांतील 593 आरोग्य संस्थांमध्ये यांत्रिक वस्त्रधुलाई सेवा केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे राज्यामध्ये साथरोग उद्रेक काळात जीवाणू व विषाणू चाचणी जलद गतीने करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, पुणे येथे रेण्वीय निदान प्रयोगशाळा उभारणार असल्याची घोषणा या वेळी करण्यात आली.
झोपणारे ठरावीक वेळी झोपतात. मी पहाटे 4 वाजता उठतो, फिरतो, व्यायाम करतो. रात्री 10-11 पर्यंत काम करतो. रात्री 11 ते 2 मुख्यमंत्री काम करतात आणि एकनाथ शिंदे 2 ते 4 या वेळेत काम करतात. म्हणून आमचे सरकार 24 तास कार्यरत असते. त्यामुळे अधिकार्यांची पंचाईत होते.- अजित पवार, उपमुख्यमंत्री
अजित पवार नेहमी परीक्षा घेतात आणि आमची अडचण होते. आजही परीक्षा घेत कार्यक्रमाला दादा वेळेत अगदी सकाळी 8 वाजता आले. दादांची वेळ मिळणे हे महत्त्वाचे आहे, ते स्वच्छतेचे भोक्ते आहेत. एखादी गोष्ट न आवडल्यास त्याबाबत स्पष्टपणे बोलणारे ते कदाचित एकमेव राजकारणी असावे.- प्रकाश आबिटकर, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री