पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नियोजित डुडुळगाव येथील गृहप्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. प्रकल्पासाठीची बांधकाम परवानगी अंतिम टप्प्यात आहे. महिनाभरात निविदाप्रक्रिया राबवून प्रकल्पाचे काम सुरू करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. या प्रकल्पात 1 हजार 100 सदनिका उभारण्यात येणार आहेत. पालिकेने मोठा गाजावाजा करीत पंतप्रधान आवास योजना जाहीर केली. आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) चर्होली, बोर्हाडेवाडी, रावेत, डुडुळगाव, वडमुखवाडी, चिखली, दिघी, पिंपरी व आकुर्डी या 10 ठिकाणी एकूण 9 हजार 458 सदनिका बांधण्याचे नियोजन केले. परंतु, यापैकी केवळ चर्होली व बोर्हाडेवाडी येथील एकूण 2 हजार 730 सदनिकांच्या प्रकल्पाला गती मिळाली.
तर, आकुर्डी गृहप्रकल्पातील 568 आणि पिंपरीतील 370 सदनिका बेघरांसाठी राखीव आहेत. न्यायालयीन वादात अडकल्याने 934 सदनिकांचा रावेतचा प्रकल्प प्रलंबित आहे. नियोजित चारपैकी डुडुळगावमध्ये गृहप्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पालिकेने सादर केलेला डीपीआर केंद्र शासनाकडून मंजूर झाला आहे. तसेच, बांधकाम परवानगीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. पर्यावरण ना हरकत दाखला मिळण्याची कार्यवाही सुरू आहे. आगामी महिनाभरात निविदा काढण्यात येणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पाचे काम सुरू केले जाणार आहे. दोन हेक्टर जागेत हा गृहप्रकल्प होणार असून, सात इमारतींमध्ये 1 हजार 100 सदनिका बांधण्यात येणार आहेत. आवास योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना या सदनिका उपलब्ध होतील.