पुणे

प्रभू श्री रामचंद्र उद्यानाला अवैध पार्किंगचा विळखा; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Laxman Dhenge

वाघोली : पुढारी वृत्तसेवा : वाघोलीतील गणेशनगर येथे प्रभू श्री रामचंद्र उद्यानाचे दोन वर्षांपूर्वी थाटात उद्घाटन करण्यात आले. परंतु, वाघोलीच्या वैभवात भर टाकणार्‍या या उद्यानाला सध्या अवैध पार्किंगचा विळखा आहे. यामुळे उद्यानात विरुंगळ्यासाठी येणार्‍या ज्येष्ठांसह लहान मुले, महिला व नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाघोली येथील रायसोनी कॉलेज रस्त्यावर गणेशनगर येथे माजी उपसरपंच संदीप सातव यांच्या प्रयत्नातून हे उद्यान उभारण्यात आले. रोज असंख्य नागरिकांसह, ज्येष्ठ, लहान मुले, महिला विरुंगळ्यासाठी या उद्यानात येतात. परंतु, उद्यानाच्या परिसरात वाहनांचे अवैध पार्किंग करण्यात येत आहे.

त्यातच या रस्त्यावर सतत वाहनांची वर्दळ असते. यामुळे नागरिकांना उद्यानात येताना धोका पत्करावा लागत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. उद्यानाला अगदी लागूनच इंग्लिश स्कूल, अंगणवाडी, हॉस्पिटल आहे. याच रोडवर प्राथमिक आरोग्य केंद्र व एक इंजिनिअर कॉलेज आहे. तसेच उद्यानाला लागून एका दूध व्यावसायिकांने दुधाचा साठा करण्यासाठी लोखंडी कंटेनर ठेवून अतिक्रमण केले आहे. दूध व्यावसायिकाकडून रस्त्यावरच दुधाच्या गाड्या उभ्या केल्या जातात. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. त्यातच बाजाराच्या दिवशी उद्यानाच्या परिसरात वाहने उभी केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. नगर रोड वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक अतिक्रमण निरीक्षक कुणाल मुंढे यांच्याशी संपर्क केला असता परिसराची पाहणी करून कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

केवळ उद्यानालगतच नव्हे, तर वाघोलीतील अनेक ठिकाणी अतिक्रमण होत आहेत. अतिक्रमणाचा प्रश्न भविष्यात महापालिका प्रशासनाची डोकेदुखी ठरू शकतो. त्यामुळे अतिक्रण विभागाने वेळीच कारवाई करणे गरजेचे आहे.

– प्रकाश जमधडे, सामाजिक कार्यकर्ते

रस्त्यावर वाहने उभी करून रहदारीस अडथळा निर्माण करणार्‍या वाहनांवर लवकरच कारवाई करण्यात येईल.

– गजानन जाधव, सहायक पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, लोणीकंद

हेही वाचा

SCROLL FOR NEXT