मंचर: दुधामध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असून, त्यासाठी शेतकरी दोषी नसून, डेअरीमालक आणि दुधाचे प्लांटधारक जबाबदार आहेत. तसेच, गोवंश हत्याबंदी कायद्याचा आधार घेत हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते जनावरांच्या खरेदी-विक्रीमध्ये हस्तक्षेप करत असल्याने शेतकरी वर्ग वैतागला आहे.
या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी निवेदनाद्वारे केली. (Latest Pune News)
पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाची वार्षिक सभा पुणे येथे शुक्रवारी (दि. 26) झाली. या वेळी उपमुख्यमंत्री पवार, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष ॲड. स्वप्निल ढमढेरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. बैठकीत बांगर यांनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या.
निवेदनात म्हटले आहे की, संकरित जर्शी गायींच्या गोऱ्ह्यांचा शेती वा बैलगाडी कामासाठी उपयोग होत नसल्याने शेतकरी ती सोडत आहेत. पशुसंवर्धन विभागाने या गायी उपलब्ध करून दिल्या असल्यामुळे शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. शेतकऱ्यांनी देशी गोवंशावर भर देण्याची आणि संकरित गायींच्या मर्यादेत बदल करण्याची मागणी केली.
दुसरीकडे, दुधामध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असून, त्यासाठी शेतकरी जबाबदार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या भेसळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, कॅन्सरसारखे आजार वाढत आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी भेसळ रोखण्यासाठी कठोर कायदा, दोषींना जामिन नाकारणे आणि अन्न व औषध प्रशासनाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनी याबाबत लवकरच मुंबई येथे बैठक घेण्याचे आश्वासन दिल्याचे बांगर यांनी सांगितले.