पुणे

पानशेत खोर्‍यात विजेचे खांब जमीनदोस्त; जोरदार वार्‍यामुळे वीजपुरवठा खंडित

अमृता चौगुले

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा : मंगळवारी (दि.7) रात्री जोरदार वादळी वार्‍याने रायगड व पुणे जिल्ह्यांच्या हद्दीवरील डोंगरी भागात धुमाकूळ घातला. तुरळक पाऊस पडला. मात्र, वार्‍यामुळे टेकपोळे, डिगेवस्ती, टाकी धनगर वस्त्यांतील विजेचे 12 खांब जमीनदोस्त झाले. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. धनगर वस्त्यांमध्ये काही ठिकाणी विजेच्या तारा, खांब वाकल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. खंडित वीजपुरवठा सुरू करण्यासाठी महावितरणच्या पानशेत विभागाचे शाखा अभियंता नितीन धस यांनी कर्मचार्‍यांसह धाव घेतली.

दिवसभरात काही ठिकाणी तारा, खांबांची दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरू केला. रात्री आठच्या सुमारास जोरदार वारे वाहू लागले. गवताच्या घरांच्या छपरे उडून गेली, असे माजी सरपंच दिनकर बामगुडे म्हणाले. टेकपोळे, टाकी धनगर वस्त्यांतील विजेचे खांब कोसळले. तारा जमीनदोस्त झाल्या.सुदैवाने दुर्घटना घडली नाही, असे महावितरणचे पानशेत विभाग शाखा अभियंता नितीन धस यांनी सांगितले. गुरुवारी (दि.9) दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे.

SCROLL FOR NEXT