पुणे

पिंपरी : डेडलाइन संपल्यानंतरही रस्त्यांवर खड्डेच !

अमृता चौगुले

पिंपरी : शहरातील विविध रस्त्यांवर महापालिकेला तब्बल साडेसहा हजार खड्डे आढळले असून, हे खड्डे बुजविण्याची मोहीम महापालिका प्रशासनाने हाती घेतली होती. खड्डे बुजविण्यासाठी महापालिका प्रशासनाने निश्चित केलेली डेडलाइन गुरुवारी (दि. 15) संपली. तरीही, अद्यापही विविध रस्त्यांवर खड्डे पाहण्यास मिळत आहे. शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात महापालिका प्रशासनाला अपयश आले आहे.  जून ते सप्टेंबर अशा चार महिन्यांच्या कालावधीत पाऊस सुरू होता. या कालावधीत रस्त्यांवर खड्डे पडले.

पावसामुळे हे खड्डे बुजविणे शक्य नसल्याचे कारण देत महापालिका प्रशासनाने त्याबाबत चालढकल केली. गेल्या दोन महिन्यांपासून पाऊस थांबला आहे. डांबर, खडी, मुरुम, पेव्हिंग ब्लॉक अशा विविध माध्यमांतून हे खड्डे बुजविण्यास महापालिका प्रशासनाने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात केली. 5 डिसेंबरपर्यंत एकूण 6 हजार 311 खड्डे बुजविले. तर, 212 खड्डे बुजविण्याचे बाकी होते. दरम्यान, गेल्या 12 दिवसांमध्ये त्यातील बहुतांश खड्डे बुजविण्यात आल्याची माहिती शहर अभियंता मकरंद निकम यांनी दिली.

अनेक ठिकाणच्या  साइडपट्ट्या खचलेल्या

शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्डे बुजविण्यासाठी निर्धारित केलेली डेडलाइन गुरुवारी (दि. 15) संपली. त्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांची पाहणी केली असता बहुतांश ठिकाणी छोटे खड्डे, साइडपट्ट्या खचलेल्या स्थितीत आहेत. काही ठिकाणी आडवे चर खोदलेले व खोदत असल्याचे दिसले. त्यामुळे खड्ड्यांपासून वाहनचालकांची सुटका होणार की नाही, हा प्रश्न कायम आहे.

खड्ड्यांमुळे बळी ?

शाहूनगर येथे गणपती चौक अमित कॉर्नरजवळ गेल्या वीस दिवसांपूर्वी दुचाकीवर आईसोबत जाणार्‍या आठवीत शिकणार्‍या मुलाचा मृत्यू झाला होता. हा अपघात खड्ड्यांमुळे झाल्याचा आरोप आहे. तपासामध्ये कारण स्पष्ट होईल. मात्र, अपघातांना खड्डे कारण ठरत असतील, तर ते बुजविणे आवश्यक आहे.

बहुतांश खड्डे बुजविण्यात आले आहेत. नवीन झालेले खड्डे बुजविण्याचे काम बाकी आहे. हे काम सध्या सुरू आहे. दर सोमवारी या कामाचा आढावा घेण्यात येतो. रस्त्यांवरील खड्डे बुजविले गेले आहे की नाही, याची तपासणी केली जाते.
                                      – मकरंद निकम,  शहर अभियंता, महापालिका

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT