मंचर, पुढारी वृत्तसेवा: कळंब (ता. आंबेगाव) येथील सहाणे मळा वस्तीजवळील पुणे – नाशिक महामार्गाला मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे या रस्त्यावर सतत अपघात होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष द्यावे, तसेच बाह्यवळण रस्ता लवकर सुरू करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
नाशिक महामागार्वर रविवारी( दि. 11) खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात एसटी बसने दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीवरील महिला ठार झाली. सहाणेमळा वस्ती ते भवानी माता मंदिरपर्यंत नागरिकांना कोणता खड्डा चुकवावा असा प्रश्न पडत आहे. वाहन चालवताना अचानक गाडीपुढे खड्डा आल्याने ब्रेक दाबल्याने मागील वाहन आदळून अपघात होत आहेत. खड्डा चुकवताना रस्त्याच्या कडेला असणार्या मालवाहतूक गाड्यांना देखील वाहने धडकत आहेत. दरम्यान, जोरदार पावसाने पुणे – नाशिक महामार्गाची वाताहात झाली आहे. रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी रस्ता दुरुस्ती होणे गरजेचे आहे, अशी मागणी माजी सभापती वसंतराव भालेराव, माजी सभापती उषा कानडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कानडे, भीमाशंकर कारखाना संचालक रमेश कानडे, सरपंच राजश्री भालेराव, उपसरपंच डॉ. सचिन भालेराव आदींनी केली आहे.