पुणे: पुणे महापालिकेच्या पथ विभागाने रस्त्यांवरील खड्ड्यांची तक्रार नोंदवण्यासाठी सुरू केलेल्या ’पीएमसी रोड मित्र’ अॅपच्या कार्यप्रणालीवर नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. या अॅपद्वारे आलेल्या तक्रारींवर कारवाई करताना फक्त तक्रार केलेले खड्डे भरले जात असून, आजूबाजूचे इतर खड्डे तसेच सोडले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांकडून महापालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते नुकतेच ’पीएमसी रोड मित्र’ अॅपचे अनावरण करण्यात आले होते. अॅपच्या माध्यमातून नागरिक फोटो- व्हिडीओसह खड्ड्यांची तक्रार करू शकतात. (Latest Pune News)
तक्रार आल्यानंतर 72 तासांच्या आत कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. आतापर्यंत 787 तक्रारी महापालिकेकडे आल्या असून त्यापैकी 692 तक्रारींचे निराकरण झाले आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी केवळ तक्रारीतील खड्डा बुजवून बाकीचे खड्डे कायम सोडले जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
या पार्श्वभूमीवर आयुक्त नवल किशोर राम यांनी रस्ते विभागाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत. “फक्त तक्रार केलेले खड्डेच न भरता त्या परिसरातील सर्व खड्ड्यांची दुरुस्ती करा. नागरिकांनी दिलेल्या तक्रारींना दिखाव्यापुरते न सोडता प्रत्यक्षात संपूर्ण रस्ता सुरक्षित होईल, याची खात्री करून घ्या,” अशा शब्दांत त्यांनी पथ विभागाला इशारा दिला आहे.