पुणे

लोणी: शिरदाळे परिसरात पावसामुळे बटाटा पीक धोक्यात

अमृता चौगुले

लोणी-धामणी, पुढारी वृत्तसेवा: गेल्या आठवड्यात ढगफुटीसदृश झालेला पाऊस त्यात झालेले नुकसान आणि बुधवारी (दि.3) दुपारी झालेला जोरदार पाऊस यामुळे शिरदाळे (ता. आंबेगाव ) येथील शेतकरी पूर्णपणे संकटात आला आहे. बटाटा, सोयाबीन, वाटाणा ही पिके पूर्णपणे जाण्याची भीती निर्माण झाली आहे. तरीदेखील याकडे कृषी, महसूल विभाग दुर्लक्ष करत असून, त्वरित पंचनामे करावेत, अशी मागणी शिरदाळ्याच्या सरपंच वंदना तांबे, माजी सरपंच सुप्रिया तांबे, बिपीन चौधरी, जयश्री तांबे यांनी केली आहे.

यावर्षी पावसाचे प्रमाण पाहता संपूर्ण खरीप हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. गेल्या काही दशकातील हा विक्रमी पाऊस असून यात अनेक घरांचीदेखील पडझड झाली आहे. याचीदेखील कुठलीही दखल प्रशासनाने घेतली नाही. लवकरात लवकर या भागाचे पंचनामे होऊन त्याचा मोबदला शेतकर्‍यांना मिळाला पाहिजे. अन्यता तीव्र आंदोलन केले जाईल, असे शेतकरी निवृत्ती मिंडे, बाबाजी चौधरी, सुरेश तांबे, राघू रणपिसे, कांताराम तांबे, केरभाऊ तांबे या शेतकर्‍यांनी सांगितले.

मागील आठवड्यात झालेला आणि सध्याचा पाऊस यामुळे शिरदाळे परिसर जलमय झाला आहे. पावसाळ्याचे दिवस संपलेले नाहीत, त्यामुळे नुकसान वाढण्याची शक्यता आहे. खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले होते; परंतु कुठलाही अधिकारी आमच्याकडे फिरकला नाही. खासदारांच्या आदेशालादेखील केराची टोपली दाखवली की काय, अशी शंका येत आहे. शेतकरी संतापला आहे, त्यामुळे लवकरच पंचनामे करावेत.
– वंदना तांबे, सरपंच

SCROLL FOR NEXT