नंदकुमार सातुर्डेकर :
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरामध्ये पार्सल वितरण करण्यासाठी पोस्ट कार्यालयाने सहा कर्मचार्यांना ई-बाईक दिल्या आहेत. त्यामुळे एका अर्थाने पोस्टमन पर्यावरण दूत बनले असून, ई बाईकमुळे त्यांच्या कामाचा उरक वाढला आहे.
गुुंतवणूकदारांना पोस्टांची भुरळ
पोस्ट खात्याने आपली विश्वासार्हता जपली आहे. त्याबरोबरच मागासलेपणा दूर सारून कालानुरूप कात टाकली आहे. इंडियन पोस्ट पेमेंट बँक, बचत बँक, विविध विमा व गुंतवणूक योजनांनी गुंतवणूकदारांना भुरळ घातली आहे. आता नागरिकही गुंतवणुकीसाठी पोस्टाला पसंती देत आहेत. हे करत असताना पोस्ट कार्यालयातर्फे टपाल वितरण करण्यासाठीही सुधारणा करण्यात येत आहेत. त्यासाठी आता ई बाईक उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शहरात 33 पोस्ट कार्यालय
पिंपरी चिंचवडमध्ये एकूण 33 पोस्ट कार्यालय आहेत. शहरातील मोठे पार्सल पोहोचविण्यासाठी मोठी चारचाकी मेल गाडी आहे. या गाडीतून दोन किलोच्या पुढील पार्सल पोहोचविले जाते. यापूर्वी पोस्टमन 500 ग्रॅम ते दोन किलोपर्यंतचे पार्सल आपल्या सायकलवरून घेऊन जात असत. असे पार्सल बॅगेत भरून सायकलवर घेऊन जाणे त्यांना काहीसे त्रासाचे होत होते. त्यामुळे चिंचवड डिलिव्हरी पार्सल विभागाने आपल्या सहा पोस्टमनना ई बाईक दिल्या आहेत. या गाड्या पोस्टाने भाड्याने घेतल्या आहेत. पार्सल डिलिव्हरीसाठी त्यांचा वापर केला जात आहे.
दोन किलोपर्यंतच्या पार्सल डिलिव्हरीसाठी बाईक उपयुक्त
चिंचवडच्या स्वतंत्र डिलिव्हरी पार्सल विभागातून औंध कॅम्प, पिंपरी कॉलनी, खराळवाडी, चिंचवडगाव, चिंचवड स्टेशन, आकुर्डी, प्राधिकरण, रुपीनगर, भोसरी औद्योगिक पोस्ट ऑफिस, भोसरीगाव पोस्ट ऑफिस या दहा ते बारा पोस्ट ऑफिसची पाचशे ग्रामच्या पुढील पार्सलची डिलिव्हरी चिंचवड स्टेशन पोस्ट ऑफिसमधून होते. 500 ग्राम ते 2 किलोपर्यंतचे पार्सल वितरित करण्यासाठी बाईक अतिशय उपयुक्त ठरत आहेत.
दहा ते बारा पोस्ट ऑफिसची पाचशे ग्रामच्या पुढील पार्सलची डिलिव्हरी चिंचवड स्टेशन पोस्ट ऑफिसमधून होते. रोज सरासरी 1 हजार पार्सल वितरित केले जातात. सुटीच्या दुसर्या दिवशी पार्सलची संख्या साधारण दीड हजारपर्यंत असते. ई बाईकमुळे पोस्टमनचे कष्ट काहीसे कमी झाले आहे. दुसरीकडे सायकलऐवजी बाईकचा वापर केला जात असल्याने कामाचा उरकही वाढला आहे. पर्यावरणपूरक वाहन दिले गेल्याने पोस्टमन पर्यावरण दूत ठरले आहेत.
– के. एस. पारखी, जनसंपर्क निरीक्षक, पोस्ट खाते