पुणे: राज्य शासनाच्या क्रीडा विभागाने व्यायामशाळा साहित्यासाठी 150 कोटी रुपये तर क्रीडा साहित्यासाठी 80 कोटी रुपयांच्या निविदा मागविल्या आहेत. या दोन्ही निविदांच्या अटी व शर्ती काही विशिष्ट कंपन्या डोळ्यांसमोर ठेवून टाकण्यात आल्या असून यातून 230 कोटींचा घोटाळा होऊ शकतो. त्यामुळे या दोन्ही निविदांची प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ता सुनील माने यांनी केली आहे.
पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना माने यांनी या प्रकरणासाठी क्रीडा आयुक्तांसह संबंधित जबाबदार अधिकार्यांची चौकशी करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणीही केली. या निविदेमध्ये केंद्रीय दक्षता आयोगाचे नियमही पायदळी तुडवण्यात आले आहेत. या निविदेतील अटी क्रीडा व व्यायामशाळा या क्षेत्रांशी संबंधित नसलेल्या कंपन्यांना पात्र ठरवण्यासाठी घालण्यात आल्या आहेत.
त्यामुळे हे टेंडर तातडीने रद्द करून त्याऐवजी नवीन सुधारित टेंडर आणावे. निविदांमध्ये तांत्रिक पात्रतेत वार्षिक उलाढालीच्या अटीमध्ये तफावत आहे, याबाबत अधिकारी, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांची नावे गोवत आहेत. मुख्यमंत्र्यांनी याबाबत खुलासा करावा, अशी मागणी माने यांनी केली.