खेड शिवापूर : पुढारी वृत्तसेवा : मागील तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस झाला. त्यातच शनिवारी (दि. १५) झालेल्या मुसळधार पावसामुळे कात्रजच्या जुन्या घाटात डोंगरावरील माती वाहून पाण्याचा निचरा वाहून नेणाऱ्या गटारात गेल्याने ती बुजली असून सर्व माती रस्त्यावर आली आहे. तसेच काही ठिकाणी छोट्या-मोठ्या दरडी कोसळल्या आहेत. भविष्यात दरडी कोसळण्याचे व रस्ता वाहून जाण्याची शक्यता आहे. यासाठी संबंधित प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.
पुणे शहराच्या दक्षिण बाजूस तसेच घाट परिसरात शनिवारी दुपारी तीन नंतर मुसळधार पाऊस झाला. गाराही मोठ्या प्रमाणात पडल्या. त्यामुळे कात्रज जुन्या घाटात डोंगरावरील पाण्याचा प्रवाहाबरोबर डोंगरावरील मातीही रस्त्यावर आली. त्यामुळे पाणी व निचरा वाहून नेणारे गटार मातीने झाकून गेले. त्याचप्रमाणे काही ठिकाणी छोट्या दरडी कोसळल्या. यामुळे कात्रज जुन्या घाटात पुन्हा एकदा मोठी दरड कोसळण्याची शक्यता असून अपघाताचा धोका संभवतो आहे.
दरम्यान, कात्रज जुन्या घाटात सुरक्षेसाठी कुठलीही ठोस, अशी उपाययोजना केली नसल्याचे स्पष्ट होत आहे. रस्त्याच्या कडेला मोडकळीस आलेली झाडे वनविभाग खात्याकडून काढली गेली पाहिजेत. मात्र, वनविभाग याबाबत उदासीन असल्याचे चित्र आहे.
पहिल्या पावसात आपण गटार किती प्रमाणात खोदले गेले पाहिजे, याचा अंदाज घेत असतो. मात्र, हा अवकाळी पाऊस आहे. त्यामुळे उद्या लगेचच निचरा वाहून नेणारी गटारे साफ करण्याच्या सुचना देण्यात येणार आहेत. वनविभागाला मोडकळीस आलेल्या झाडांबाबत पत्रक देणार आहोत.
– नकुल रनसिंग, (सार्वजनिक बांधकाम विभाग)
हेही वाचा