पुणे: कल्याणीनगरमधील पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे रक्त बदलल्याप्रकरणी कारागृहात असणारे ससून रुग्णालयाच्या न्यायवैद्यक विभागाचे तत्कालीन प्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर या दोघांचाही वैद्यकीय परवाना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी) निलंबित केला आहे.
19 मे 2024 रोजी मध्यरात्री कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारने दोन अभियंता मित्र-मैत्रिणीला उडवले होते. त्यात त्यांचा मूत्यू झाला होता. अपघातानंतर अल्पवयीन कारचालकाची वैद्यकीय तपासणी ससून रुग्णालयात करण्यात आली होती.
मात्र, तपासणी करताना रक्ताचे नमुने बदलल्याचे पोलिस तपासातून समोर आले होते. त्यानंतर डॉ. तावरे आणि आपत्कालीन कक्षातील तत्कालीन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. हाळनोर या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून दोघेही कारागृहात आहेत.
डॉ. तावरे आणि हाळनोर हे दोघेही कारागृहात असून, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणाचा अंतिम निकाल लागेपर्यंत दोघांचेही परवाने निलंबित राहणार आहेत. त्यामुळे दोघांनाही निकाल लागेपर्यंत वैद्यकीय सेवेत काम करता येणार नसल्याचे एमएमसीने स्पष्ट केले आहे.
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या समितीनेही या प्रकरणाची चौकशी केली होती. या समितीच्या अहवालानुसार या दोघांना ससून रुग्णालयातून निलंबित करण्यात आले होते.
वैद्यकीय सेवा करता येणार नाही
राज्यातील डॉक्टरांची नोंदणी एमएमसीकडे असते. या नोंदणीनुसार डॉक्टरांना वैद्यकीय सेवा करता येते. मात्र, या दोघांचीही नोंदणी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे दोघांनाही वैद्यकीय सेवा करता येणार नाही.