पुणे

पुणे : डाळिंबाची लाली ओसरली; दर 10 टक्क्यांनी उतरले

अमृता चौगुले

पुणे : रमजान महिना, उन्हाचा तडाखा तसेच आंब्याचा हंगाम सुरू झाल्याने खरेदीदारांनी आपला मोर्चा हापूस, कलिंगड, खरबूज, पपई, संत्री आदी फळांकडे वळविला आहे. परिणामी, बाजारात डाळिंबाच्या मागणीत 25 टक्क्यांनी घट झाली आहे. बाजारात डाळिंब मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे. मात्र, मागणी नसल्याने गत आठवड्याच्या तुलनेत डाळिंबाच्या भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली आहे.

बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने कलिंगड, खरबुजाच्या भावात किलोमागे एक ते दोन रुपयांनी वाढ झाली आहे. याखेरीज संत्र्याचे भावही दहा ते वीस टक्क्यांनी वधारले आहेत. उन्हाच्या तडाख्यामुळे शहरातील सरबत विक्रेते, रसवंतिगृहे तसेच घरगुती स्वरूपात लिंबांना मागणी होत आहे. त्यापार्श्वभूमीवर पुणे विभागासह हैदराबाद येथूनही लिंबाची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यातुलनेत मागणी नसल्याने लिंबाचे भाव 15 किलोच्या गोणीमागे 50 ते 100 रुपयांनी उतरले आहेत.

तसेच, चिकूचेही भाव दहा किलोच्या गोणीमागे 50 रुपयांनी घटल्याचे सांगण्यात आले. अन्य सर्व फळांची आवक-जावक कायम असल्याने दर टिकून होते. रविवारी (दि. 9) मार्केट यार्ड येथील फळबाजारात केरळ येथून अननस 5 ट्रक, संत्री 30 ते 35 टन, मोसंबी 30 ते 40 टन, डाळिंब 30 ते 35 टन, पपई 7 ते 8 टेम्पो, लिंबाची सुमारे दीड ते दोन हजार गोणी, कलिंगड 15 ते 20 टेम्पो, खरबूज 15 ते 20 टेम्पो, पेरू 400 ते 500 क्रेट, चिकू दोन हजार डाग, अंजीर दोन टन, हापूस आंबा 7 ते 8 हजार पेटी इतकी आवक झाली.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : 1200-1800, मोसंबी : (3 डझन) : 260-400, (4 डझन) : 120-220, संत्रा : (10किलो) : 600-1100, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 30-150, गणेश : 10-30, आरक्ता 20-50, कलिंगड : 8-12, खरबूज : 10-18, पपई : 12-25, अननस (एक डझन) : 100 ते 500, पेरू (वीस किलो) : 250-400, चिकू (दहा किलो) : 100-500, अंजीर (1 किलो) : 20-100.

SCROLL FOR NEXT