बारामती : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीतील फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा गट बारामतीत कमालीचा आक्रमक झाला आहे. घड्याळ तेच वेळ नवी ही टॅगलाईन घेऊन अजित पवार गट कामाला लागला असताना आता शरद पवार गटाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांकडून वादा तोच, दादा नवा, ना नरेंद्र ना देवेंद्र फक्त युगेंद्र असे फलक लावण्यात आले आहेत. बारामतीचे राजकारण आता कमालीचे तापू लागले असून आगामी काळात त्याची धग अधिकच जाणवेल, अशी चिन्हे आहेत.
काका शरद पवार यांना पुतणे अजित पवार यांनी धक्का दिल्यानंतर अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी काका अजित पवार यांना धक्का देत बारामतीत शरद पवार गटाच्या कार्यालयाला भेट दिली. साहेब म्हणतील तसं, असे सांगत त्यांनी राजकारणात सक्रिय होण्याचेही संकेत दिले आहेत. आमदार रोहित पवार हे कर्जत- जामखेड मतदारसंघाचे सध्या प्रतिनिधित्व करत आहेत. परंतु त्यांच्या राजकारणाची सुरुवात बारामती तालुक्यातील शिर्सुफळ-गुणवडी या जिल्हा परिषद गटातून झाली. युवकांमध्ये त्यांची अगोदरपासूनच क्रेझ होती. आता युगेंद्र यांनीही बारामतीत कार्यक्रमांचा सपाटा लावला आहे.
दुसरीकडे अजित पवार गटाकडून त्यांचे पुत्र पार्थ व जय यांनी खिंड लढविण्यास सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे पुत्र जय पवार यांनी गुरुवार (दि. 22) पासून बारामती तालुक्यात दौरे सुरू केले. शुक्रवारी (दि. 23) सुळे बारामती दौर्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत शहरात शाखा उदघाटने, युवक जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आता पोस्टरबाजीतून राजकारण अधिक पेट घेऊ लागले आहे. बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी, झारगडवाडी परिसरात हे पोस्टर लावले गेले आहेत. या पोस्टरने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. मागच्या काही दिवसात शरद पवार गटाकडे कार्यकर्ते आहेत की नाहीत असा प्रश्न उपस्थित झाला होता. परंतु या गटालाही शहरासह तालुक्यात आता मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे.
हेही वाचा