Junnar Politics: राज्यभरात नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. जुन्नर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार शरद सोनवणे हे 6 हजार 664 मतांनी विजयी झाले. यापूर्वी ते मनसे पक्षातून निवडणूक लढवून एकमेव आमदार म्हणून देखील विजयी झाले होते. जुन्नर तालुक्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची राजकीय समीकरणे त्यांच्या विजयाने पूर्णपणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट होत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सत्यशील शेरकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल बेनके या दोन्ही दिग्गज नेत्यांना विधानसभेच्या निवडणुकीत हार पत्करावी लागल्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये नेमके कोणाच्या वाट्याला यश, तर कोणाच्या वाट्याला अपयश येईल, याबाबत चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे विधानसभा हातची गेली असली, तरी पराभव वाट्याला आलेल्या सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकांसाठी आत्तापासूनच मोर्चेबांधणी सुरू केल्याची बाब समोर आली आहे.
विद्यमान आमदार शरद सोनवणे यांच्याही कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकांसाठी सावध पवित्रा घेतला असून, सोनवणे गटाचे खंदे समर्थक या वेळी बाजी पणाला लावल्याशिवाय गप्प बसणार नाहीत, हे सत्य आहे. त्यात तालुक्यातील शेतकर्यांची जीवनवाहिनी ठरलेल्या विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरण्याचा चंग बांधला जात असल्याचे वृत्त अद्याप गुलदस्तात आहे.
आमदार शरद सोनवणे यांच्या विजयामुळे आगामी निवडणुकांसाठी त्यांच्या गोटातील इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्याचे चित्र तालुकाभर दृष्टीस येत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, विघ्नहर सहकारी साखर कारखाना व तालुक्यातील काही महत्त्वाच्या गावांच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे वेधही आता कार्यकर्त्यांना लागलेले आहेत. अणे-माळशेज पट्ट्यातील ओतूर-पिंपरी पेंढार जिल्हा परिषद गटात व डिंगोरे-उदापूर जिल्हा परिषद गटातील नवनवीन इच्छुक उमेदवारांचे चेहरे निवडणुकीसाठी आत्तापासूनच सोशल मीडियावर झळकू लागले आहेत.
जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे पॅटर्न आगामी निवडणुकांत किती वेग घेणार की इतर सर्व पक्षांचे इच्छुक उमेदवार आपापले स्थान बळकट करण्यासाठी जिवाचे रान करणार, हे येणारा काळच ठरविणार असून, मतदारांमध्येही या आगामी निवडणुकांबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
सोशल मीडिया इच्छुकांच्या मदतीला
सुमारे तीन महिन्यांच्या आत या निवडणुका पार पडण्याची शक्यता वर्तविली जात असून, इच्छुक उमेदवार सोशल मीडियाच्या माध्यमातून कामाला लागल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. दरम्यान, इच्छुक उमेदवारांचे पेव फुटायला सुरुवात झाली असून, नवनवीन चेहरे या वेळी निवडणूक रिंगणात उतरण्याची दाट शक्यता वर्तविली जाऊ लागली आहे.