Pune Politics: राष्ट्रीय आणि राज्यपातळीवरील नेते आपापल्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारात उतरले असल्याने शहरातील निवडणुकीचे वातावरण आता चांगलेच तापले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे प्रमुख राज ठाकरे, केंद्रीय न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, रिपब्लिकन नेते व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचेही शहरातील प्रचार दौरे निश्चित झाले असल्याने येत्या दोन-तीन दिवसांत शहरात राजकीय धुरळा उडणार आहे. सर्वपक्षीय उमेदवार आपापल्या परीने प्रचारात जोर लावत असून, मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी अहोरात्र झटत असल्याने प्रचारात रंगत आली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यानंतर महाराष्ट्राला विकासाचे पंख लागले होते. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राचा विकास थांबला, राज्य कमकुवत झाले, अशी टीका केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी केली. भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र मीडिया सेंटरमध्ये बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते म्हणाले, महायुतीच्या काळात महाराष्ट्राच्या विकासाची गती कशी आहे आणि महाविकास आघाडी काळात विकासाची गती कशी होती, हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे. अडीच वर्षांच्या उद्धव ठाकरे सरकारच्या काळातील कारभार पाहून जनता पुन्हा त्यांचे सरकार नको, असे सांगत आहे. महायुतीच्या सरकारने आणलेल्या विविध योजनांमुळे महाराष्ट्रात थेट परकीय गुंतवणुकीचे प्रमाण वाढले आहे. पुणे हे औद्योगिक गुंतवणुकीचे देशातील सर्वाधिक आवडते ठिकाण असून, औद्योगिक क्षेत्रात शांतता ठेवण्यास महायुती कटिबद्ध आहे.
देशात मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक होत असून, रोजगारनिर्मिती होत आहे. खासगी क्षेत्र सर्वाधिक रोजगारनिर्मिती करत आहे, ही बाब काँग्रेस युवराज यांना समजत नाही. केवळ सरकारी रोजगार म्हणजे रोजगारनिर्मिती नसते. अनेक विकासकामांमुळे रोजगारनिर्मितीस चालना मिळाली आहे. जगातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारा भारत देश असून, आर्थिक महासत्ता होण्याकडे वाटचाल करत आहे, असेही गोयल म्हणाले.
सन 2047 पर्यंत विकसित भारत करण्याचा आमचा संकल्प असून, राज्यात देखील महायुतीचे सरकार खांद्याला खांदा लावून काम करत आहे. समाजातील प्रत्येक स्तरापर्यंत विकास पोहचला पाहिजे, याकडे सरकार लक्ष देत आहे. महायुती निवडणुकीत प्रचंड मताने विजयी होईल. मुंबईत सर्व जागा महायुतीला मिळतील. महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार आल्यावर विकासाची गती अधिक वाढेल. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सत्तेत असताना स्वामिनाथन आयोग यांच्या शिफारशी लागू केल्या नाहीत. पण, आम्ही त्यांच्या योजनांबाबत गांभीर्याने विचार केला, असेही गोयल म्हणाले.
अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील विविध जातींना न्याय मिळण्यासाठी आरक्षणाचे उपवर्ग करण्यास विरोध नाही, असे स्पष्ट मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
एससी आणि एसटी प्रवर्गातील विविध जातींसाठी ए. बी. सी. डी. असे उपवर्ग करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयाला अनुसूचित जाती-जमातींमधील अनेक संघटना आणि संस्थांनी विरोध केला आहे. न्यायालयाचा हा निर्णय घटनाबाह्य असून, जातींची सूची करण्याचा अधिकार पूर्णपणे राष्ट्रपतींचा आहे, असा आक्षेप अनेकांनी नोंदविलेला आहे.
या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना रामदास आठवले यांनी दोन्ही प्रवर्गातील ठरावीक जातींनाच आरक्षणाचा लाभ मिळाला आहे, असे म्हणत इतर जातींना न्याय मिळण्यासाठी आरक्षणाचे उपवर्ग करण्यास हरकत नाही. त्याला आपला विरोध नसल्याची भूमिका स्पष्ट केली. यावर अभ्यास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. ते भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र मीडिया सेंटरमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
आठवले म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत गैरसमज पसरवण्यात आले होते. आताही राहुल गांधी संविधानाचा मुद्दा सारखा उपस्थित करत आहेत. संविधान कुणीही बदलू शकत नाही. नरेंद्र मोदी पाच वर्षे पंतप्रधान राहणार असून, त्यांनी देशातील सर्व जाती-धर्माला न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. मोदी सरकार आरक्षण रद्द करणार नाही. राहुल गांधी बाहेर गेल्यावर बोलतात, की काँग्रेसने आरक्षण रद्द केले तर त्या विरोधात आम्ही लढा उभा करू.
शरद पवार यांच्यासोबत मी अनेक वर्षे काम केले आहे. ते जातीयवादी नाहीत. त्यांनी कायम सामाजिक ऐक्यासाठी काम केले. राज ठाकरे त्यांच्यावर जो जातीयवादाचा आरोप करत आहेत, तो पूर्णपणे चुकीचा आहे, असेही आठवले म्हणाले.
महाराष्ट्रातील भाजप महायुती सरकारने हिरा व्यापार, औद्योगिक कंपन्या, दूध उद्योग हे गुजरातला जाऊ दिले. काँग्रेसचा इतर राज्यांच्या विकासाला व औद्योगिकीकरणाला विरोध नाही. मात्र, महाराष्ट्रात येऊ घातलेले उद्योग गुजरातमध्ये गेल्याने महाराष्ट्राचा आर्थिक कणा मोडण्याचे काम भाजप महायुती सरकारने केले आहे.
2019 मध्ये जेव्हा भाजप सत्तेत आली तेव्हा त्यांनी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर इतकी वाढविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, पाच वर्षांत ही परिस्थिती महाराष्ट्राच्या वाट्याला आली आहे. ज्या ठिकाणी जे उद्योग आलेले आहेत किंवा येणार आहेत ते उद्योग गुजरातला पळवून घेऊन जाणे चुकीचे आहे, अशी टीका छत्तीसगडचे माजी उपमुख्यमंत्री टी. एस. सिंगदेव यांनी केली.
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगडचे माजी उपमुख्यमंत्री टी. एस. सिंगदेव यांनी काँग्रेस भवनमध्ये बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला, त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस महासमितीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. शमा मोहंमद, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी, कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरज हेगडे, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष अरविंद शिंदे आदी उपस्थित होते.
सिंगदेव म्हणाले, विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून ’महाराष्ट्रनामा’ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये पहिल्या शंभर दिवसांत अडीच लाख सरकारी नोकरभरतीची प्रक्रिया राबविण्याचे आम्ही आश्वासन दिले आहे. तसेच पुढील पाच वर्षांचे नियोजन देखील दिले आहे. 2030 पर्यंत महाराष्ट्राला परकॅपिटल इन्कममध्ये अव्वल क्रमांकावर घेऊन जाण्याचा आमचा मानस आहे.
भाजप महायुती सरकारच्या धोरणावर टीका करताना सिंगदेव म्हणाले, महायुतीचे सरकार राज्यात आल्यानंतर पुण्यातील हिंजवडी भागातून 37 आयटी कंपन्या, तर चाकण औद्योगिक वसाहतीमधून 50 औद्योगिक कंपन्यांनी स्थलांतर केले आहे. वेदांता-फॉक्सकॉन, टाटा एअर बस, इतकेच काय महाराष्ट्राचा डेअरी उद्योग गुजरातच्या घशात घालण्याचा उद्योग भाजपने केला आहे. धारावीमध्ये एक मिलियनची अर्थव्यवस्था आहे, तिथल्या नागरिकांना विस्थापित करून ती जमीन एका बड्या उद्योजकाला देण्याचा तसेच त्या प्रकल्पाच्या आजूबाजूच्या जमिनीही त्याच ग्रुपला देण्याचा डाव महायुतीने रचून महाराष्ट्रचे आर्थिक नुकसान केले आहे.
देशात सेमीकंडक्टरचे पाच मोठे प्रोजेक्ट येत आहेत, ज्यामधून साडेतीन हजार कोटींची अर्थव्यवस्था आणि लाखो रोजगार निर्माण होत आहेत. मात्र, त्यातील चार केवळ गुजरात या एकाच राज्यात का देण्यात येत आहेत? मुंबईतील हिरे व्यापार पळवून नेताना सुरतला डायमंड बोर्ससाठी पोषक वातावरण नसतानाही केवळ दोन लोकांना खूष करण्यासाठी नेण्यात आल्याचेही टी. एस. सिंगदेव यांनी नमूद केले.