शंकर कवडे
पुणे : दिवाळीचा उत्सव आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांची चाहूल या दोन्हींचा संगम यंदा अनोख्या पद्धतीने दिसत आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर वातावरणाला राजकीय रंग चढल्याने राजकीय पक्षांसह इच्छुक आणि वरिष्ठ नेत्यांची छायाचित्रे असलेले कंदील तयार करवून घेण्याकडे इच्छुकांचा कल वाढला आहे. त्यामुळे यंदा दिवाळीत शहरातील प्रमुख चौकांसह सोसायट्या, पक्ष कार्यालय तसेच इच्छुकांच्या कार्यालयासमोर असे आकाशकंदील लावून त्याद्वारे प्रचार करण्याचा चंग इच्छुकांनी बांधला आहे. (Latest Pune News)
शुक्रवार पेठ येथील बुरुड आळीत सध्या मोठ्या प्रमाणात असे कंदील तयार होऊ लागले आहेत. तीन फुटांपासून पाच फुटांपर्यंत हे कंदील तयार करण्यात येत आहेत. निवडणुकांच्या अनुषंगाने कंदिलांवर विविध पक्षांच्या नेत्यांसह इच्छुक उमेदवारांचे स्वत:चे फोटो झळकविण्याकडे कल आहे. इच्छुकांच्या मागणीनुसार हे कंदील तयार करण्यात येत असून, पाहिजे त्या डिझाइनमध्ये आकाशकंदील बनवून देण्यात येत आहेत. याखेरीज काही इच्छुकांकडून छोटे कंदील तयार करून त्यामार्फत घरोघरी पोहचण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
कंदिलाच्या माध्यमातून दिवाळीच्या प्रकाशात राजकीय प्रचाराचा नवा ट्रेंड आकार घेताना दिसतो आहे. सणाच्या शुभेच्छांच्या आडून मतदारांच्या मनावर छाप पाडण्याचा प्रयत्न इच्छुकांकडून सुरू आहे. कंदील तयार करणाऱ्या कारागिरांकडे इच्छुकांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे. काही ठिकाणी वरिष्ठ नेत्यांचे फोटो ठळकपणे लावून ‘वरिष्ठांचे आशीर्वाद’ मिळाल्याचा संदेश देण्याचाही प्रयत्न केला जात आहे. सण-उत्सवात सजावट आणि आनंदाचे वातावरण निर्माण करण्यासोबतच राजकीय उपस्थिती नोंदवण्याचे हे नवे माध्यम ठरत आहे. परिणामी, दिवाळीच्या उजेडात यंदा ‘राजकारणाचाही रंग’ अधिक ठळकपणे झळकताना दिसणार आहे.
दिवाळीत ‘आकाशकंदील’ हा महत्त्वाचा घटक आहे. त्यादृष्टीने छोटेखानी कंदील वाटपासह भव्य कंदील तयार करवून घेण्याकडे इच्छुकांचा कल वाढला आहे. त्यामुळे यंदा भव्य कंदिलामुळे शहरातील प्रमुख चौक, तर छोट्या कंदिलामुळे गोरगरिबांच्या
घरांची शोभा वाढणार आहे. तसेच, या उपक्रमामुळे इच्छुकही घरोघरी पोहचून त्यांना प्रचारासाठी मदत होईल.ॲड. सतीश मुळीक, नागरिक, वडगाव शेरी
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर छोटेखानी कंदिलापासून मोठ्या कंदिलांना मागणी होत आह. ग््रााहकांच्या गरजेनुसार कंदील बनवून देण्यात येत आहेत. कंदिलाच्या आकारानुसार दर ठरविण्यात येतात. बांबू व कापडापासून बनविलेले कंदील टिकत असल्याने त्यास चांगली मागणी आहे. याखेरीज घरगुती ग््रााहकांकडून कंदिलाला मागणी होत आहे.अनंता मोरे, बांबू विक्रेते, बुरुड आळी