पुणे

पोलिस अधिकारी,कर्मचार्‍यांनी गुणवत्ता वाढवावी : उपमुख्यमंत्री अजित पवार

अमृता चौगुले

माळेगाव : पुढारी वृत्तसेवा :  'माळेगाव पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍यांना चांगल्या वातावरणात काम करता येणार आहे. त्यासाठी पोलिस कर्मचार्‍यांनी आपल्या गुणवत्तेत व कार्यक्षमतेत वाढ करण्याची आवश्यकता असून, गुन्हेगारीला आळा बसला पाहिजे, गुन्हेगाराला दहशत वाटली पाहिजे; जेणेकरून या भागातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत होईल,' असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथील नवीन पोलिस ठाण्याच्या सुसज्ज इमारतीचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, बारामती विभागाचे अपर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, बारामती विभागाचे उपअधीक्षक गणेश इंगळे, माळेगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी किरण अवचर व इतर मान्यवर उपस्थित होते.

जिल्ह्यातील आणि शहरातील पोलिसांना कोणत्याही घटनास्थळी ताबडतोब पोहचण्यासाठी वाहनांची अडचण येऊ नये, यासाठी दहा कोटी रुपयांच्या गाड्या देण्यात आल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे दिले आहेत, असे सांगून पवार पुढे म्हणाले की, पोलिसांना आपण सर्व यंत्रणा पुरवत असताना बारामती शहरामध्ये एका रात्रीत 16 घरफोड्या होतात, याची खंत आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण राखण्यासाठी पोलिस आणि नागरिकांमध्ये संवाद व समन्वय राखण्याचा प्रयत्न पोलिस कर्मचार्‍यांनी केला पाहिजे. पावसाने ओढ दिल्याने शेतातील पिके वाळून गेली आहेत, तर काही पिकांनी माना टाकल्या आहेत.

अशी जरी निसर्गाने परिस्थिती केली असली, तरी यांच्यावर मात करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह याचा विचार करून शेतकर्‍यांसाठी आपण निरा डावा कालव्याला व जानाई-शिरसाई योजनेला पाणी सोडून न्याय देण्याचा आपला प्रयत्न आहे, असेही पवार यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर अर्थ खात्याची जबाबदारी टाकली आहे. त्यामुळे राज्याबरोबर जिल्हा, तालुक्याला न्याय देण्याचा माझा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले. आरोग्य विभागासाठी आय केअर फाउंडेशनच्या माध्यमातून 50 लाखांचे संगणक दिले आहेत. सरकारचा पैसा असल्याने कामे चांगली झाली पाहिजेत, हा आमचा प्रयत्न आहे. पुढील काळात बारामतीचा चेहरामोहरा बदललेला असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. उपस्थित नागरिकांचे पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT