Mangesh Jagtap Fraud Case Pudhari
पुणे

Mangesh Jagtap Fraud Case: लग्नाचे आश्वासन, लाखोंची फसवणूक आणि आता जि. प. सदस्य फरार; बारामतीतील प्रकरणाने खळबळ

बारामती तालुक्यातील प्रकरणाने खळबळ

पुढारी वृत्तसेवा

माळेगाव: लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर लैंगिक अत्याचार करून आणि त्याच युवतीची ८ ते १० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करून बारामती तालुक्यातील पणदरे येथील राष्ट्रवादी काँग्रेस (अप) चा जिल्हा परिषद सदस्य मंगेश प्रताप जगताप फरारी झाला आहे.

जगतापविरुद्ध माळेगाव पोलिस ठाण्यात बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांनी दिली आहे.

विशेष म्हणजे या प्रकरणातील पीडित युवतीने तीन दिवसापूर्वी पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील सर्वसाधारण सभेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता, या घटनेमुळे बारामती तालुक्यात राजकीय, सामाजिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

युवतीच्या आत्मदहनाच्या प्रयत्नानंतर सुरुवातीला पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात जगतापविरुद्ध दाखल झालेला गुन्हा माळेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने पुढील तपासासाठी तो वर्ग केला आहे.

या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना पोलिस अधिकारी कुलदीप संकपाळ म्हणाले की, सन २००७ मध्ये महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान दोघांची ओळख झाली व पुढे प्रेमसंबंध निर्माण झाले. आरोपी मंगेशने लग्नाचे आश्वासन दिले होते. मात्र, २०१२ मध्ये त्याने दुसऱ्या महिलेशी विवाह केल्याचे समजल्यानंतर फिर्यादीने संबंध तोडल्याचे तक्रारीत नमूद आहे.

त्यानंतर आरोपी मंगेशने पुन्हा संपर्क साधून पत्नीपासून घटस्फोट घेणार असल्याचे सांगितले आणि लग्नाचे आश्वासन देत पणदरे येथील फार्महाऊसवर वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप या पीडित महिलेने तक्रारीमध्ये केला आहे, तसेच वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने ८ ते १० लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचाही आरोप केला आहे.

दरम्यान, याप्रकरणी पोलिस पुढे काय पावले उचलतात, याकडे संपूर्ण बारामती तालुक्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT