पुणे: एखाद्या गुंडाच्या तोंडी भाषा शोभणार नाही, अशी भाषा एका पोलिस हवालदाराने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वापरल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही, तर त्याने एका सहाय्यक पोलिस निरीक्षकांना अश्लील शिवीगाळ करून हाताने मारहाण केली.
सर्वांत गंभीर प्रकार म्हणजे मारहाणीचा हा प्रकार पोलिस ठाण्याच्या आवारातच घडला आहे. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त चिलुमूल रजनीकांत यांनी या मुजोर पोलिस हवालदाराला खात्यातून निलंबित केले आहे. या हवालदाराचे नाव विवेक रमेश बसनगार आहे.
हवालदार बसनगार हे चतुःशृंगी पोलिस ठाण्यात नेमणुकीस आहेत. कर्तव्यावर असताना या हवालदाराने अधिकारी व महिला पोलिस अंमलदार यांचा बेजबाबदार, असभ्य व अरेरावीची जातीवाचक तसेच अश्लील शब्दांचा वापर करून जाणीवपूर्वक अपमान केल्याचा आरोप आहे. 10 मार्च रोजी याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी कसुरी अहवाल पाठवला. त्यामध्ये या हवालदाराला पाच हजार रुपये आर्थिक दंडाची शिक्षा देण्यात आली.
त्या शिक्षेचा राग मनात धरून 26 जून रोजी या हवालदाराने खडकी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक (गुन्हे) अर्वाच्य भाषेत बोलले. त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 27 जून रोजी हे हवालदार तपास पथकातील एपीआयच्या केबिनमध्ये आले. त्यांनी मोबाईल काढून शूटिंग करीत, 'तुम्ही माझी स्टेशन डायरी का केली? त्यामुळे मला शिक्षा झाली,' असे बोलून धमकावले.
काही पोलिस कर्मचाऱ्यांनी या हवालदाराला थांबविण्याचा प्रयत्न केला. तरी देखील त्याने एपीआयला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. अंगावर धावून गेला. याबाबत संबंधित एपीआयने स्टेशन डायरीत नोंद केली. दुसऱ्या दिवशी सकाळी 29 जून रोजी हे एपीआय पोलिस ठाण्यात आले. त्या वेळी या हवालदाराने त्याच्याकडील दुचाकी धोकादायकरीत्या चालवून एपीआयला शिवीगाळ करून मारहाण केली.
पोलिस उपायुक्त पोलिस ठाण्यात
दरम्यान, एपीआयला शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याच्या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त रजनीकांत चतुःशृंगी पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी या सर्व प्रकाराची माहिती घेतली. त्यानंतर या पोलिस हवालदारावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
हॅलो... डायरेक्ट विवेकभाई बात कर रहा है!
एपीआयला मारहाण करणाऱ्या या हवालदाराच्या तीन ते चार ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. एखादा गुंड बोलणार नाही असे हा हवालदार क्लिपमध्ये बोलताना दिसून येत आहे. तो म्हणतोय, डायरेक्ट विवेकभाई बात कर रहा है.
शिव्यांची लाखोली वाहत काठ्या, कुऱ्हाडी बाहेर काढा, असे म्हणत हा हवालदार एपीआयला धमकी देताना बोलत आहे. एवढेच नाही तर एका व्यक्तीला फोन करून संबंधित एपीआयच्या सोलापूर येथील नातेवाइकांची कुंडली काढा, असे एका व्यक्तीला सांगत असल्याचे दिसून येते.
त्याचबरोबर यापूर्वी देखील याच पोलिस ठाण्यात काम करणाऱ्या एका एपीआयला या हवालदाराने शिवीगाळ केली होती. तसेच, चौकशी करणाऱ्या पोलिस निरीक्षकांनासुद्धा अर्वाच्य भाषा हवालदाराने वापरली आहे.