पुणे/मुंढवा; पुढारी वृत्तसेवा : मुंढवा-केशवनगर परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पोलिसांचा गुन्हेगारांना धाक आहे की नाही, असा प्रश्न यानिमित्ताने नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. परिसरात कोयता गँगने दहशत निर्माण केली आहे. गुन्हेगारी टोळक्यांची दहशत, तसेच इतर प्रश्नांसंदर्भात उपाययोजना करण्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते यांना निवेदन देऊन या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावे, असे आवाहन आमदार चेतन तुपे यांनी नागरिकांना केले आहे.
गेल्या आठवड्यात कोयत्याने वार करत एका व्यवसायिकाचा तिघांनी खून केला. केवळ हटकल्याच्या कारणातून हा खून करण्यात आला होता. तर दुसर्या एका घटनेत सिगारेटची उधारी मागितली म्हणून कोयत्याने वार करण्यात आले. परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नागरिकांची बैठक शुक्रवारी (ता. 5) मुंढवा येथील भैरवनाथ मंदिरात पार पडली. या वेळी तुपे बोलत होते.
माजी उपमहापौर बंडू गायकवाड, बाळासाहेब कोद्रे, संदीप लोणकर, समीर कोद्रे, डॉ. दादा कोद्रे, अजित गायकवाड, अॅड. राजशेखर गायकवाड, किशोर धायरकर, राजेंद्र गायकवाड, विठ्ठल पवार राजे, युवराज गायकवाड, रमेश राऊत, तुषार रासगे, कुलदीप कोद्रे, देवीदास लोणकर आदी उपस्थित होते.
परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्याच्या मागणीसाठी गेल्या आठ दिवसांतील ही नागरिकांची तिसरी बैठक आहे. या बैठकीमध्ये मुंढवा-केशवनगर येथे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काय-काय करता येईल यावर नागरिकांनी मते व्यक्त केली. कोयता गँग, तसेच इतर चुकीच्या गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यात पोलिस अपयशी ठरत असल्याची भावना या वेळी अनेकांनी व्यक्त केली. यापुढील बैठक मुंढवा पोलिस ठाण्यात आयोजित करून योग्य उपाययोजना करण्यासंदर्भात नियोजन करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.