आश्रय देण्याच्या नावाखाली निराधार महिला, मुलींशी गैरकृत्य; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या कोठडीत 7 एप्रिलपर्यंत वाढ Pudhari File Photo
पुणे

आश्रय देण्याच्या नावाखाली निराधार महिला, मुलींशी गैरकृत्य; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या कोठडीत 7 एप्रिलपर्यंत वाढ

आणखी काही महिला व मुलींशी गैरकृत्य केले आहे का, याबाबत पोलिस तपास करत आहेत.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: संस्थेतील निराधार महिला व मुलीला आश्रयासह शिक्षण तसेच नोकरी देण्याचे आश्वासन देत जबरदस्तीने नाचायला लावून अत्याचार करणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी शंतनू सॅम्युअल कुकडे (वय 53) याने आणखी काही महिला व मुलींशी गैरकृत्य केले आहे का, याबाबत पोलिस तपास करत आहेत.

त्याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी विशेष सरकारी वकील नितीन कोंघे यांनी केली. सरकार पक्षाने केलेले युक्तिवाद ग्राह्य धरत के. डी. शिरभाते यांच्या विशेष न्यायालयाने कुकडे याच्या पोलिस कोठडीत सात एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.

कुकडेच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने गुरुवारी विशेष ‘पोक्सो’ न्यायालयात हजर करण्यात आले. त्याने पीडितेप्रमाणे इतर महिला व मुलींनाही राहण्याची व नोकरीची हमी देऊन त्यांच्याशी गैरवर्तन केल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या संस्थेचा तपास करायचा आहे, तसेच आरोपीने किती निराधार मुलींना आश्रय देऊन गैरकृत्य केले, याबाबत चौकशी करायची आहे.

या प्रकरणात एका बांधकाम व्यावसायिकाला नोटीस देण्यात आली आहे, तर पीडितेचा लैंगिक छळ करणारा आरोपी अण्णा ऊर्फ पिट्टू याचा शोध घेण्यात येत आहे. गुन्ह्याचा तपास प्राथमिक पातळीवर असून, आणखी महिला पुढे येऊन तक्रार देण्याची व गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ करावी, अशी मागणी विशेष सरकारी वकील नितीन कोंघे व उपनिरीक्षक सौरभ माने यांनी केली, न्यायालयाने ती मान्य केली.

ही घटना डिसेंबर 2024 ते 8 मार्च 2025 या कालावधीत पानशेत येथे घडली. कुकडेने त्याच्या संस्थेत पीडित तरुणी व तिच्या अल्पवयीन मैत्रिणीला राहण्याची व शिक्षण-नोकरीची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर दोघींना जबरदस्तीने नाचायला लावून त्यांचा लैंगिक छळ केला. इतकेच नव्हे तर संस्थेतील खोलीत व पानशेत येथील रिसॉर्टमध्ये बलात्कार केला.

या प्रकाराची वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली, असे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी पीडितेने 29 मार्च रोजी तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी कुकडेला अटक केली असून, न्यायालयाने त्याला गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT