पिंपरी : आकाशातील तार्यांची निर्मिती कशी होते, आपल्या सावलीचे वजन किती, कधी कधी आकाशात एखादा तारा, चांदणी पळत असते, ती कशामुळे, असे तब्बल 50 प्रश्न विचारून एकाने पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आयुक्तांनीदेखील नीलेश तुम्ही चुकीच्या ठिकाणी आला आहात, तुम्ही 'नासा' 'इलॉॅन मस्क' नाही, तर 'चॅॅट जीपीटी' येथे ट्राय करा, असे सांगून प्रश्नकर्त्याला टोलवून लावले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शुक्रवारी (दि. 5) पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी ट्विटर लाइव्हद्वारे नागरिकांशी संपर्क साधला. नागरिकांच्या समस्या जाणून घेणे, हा यामागचा उद्देश होता. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 250 पेक्षा अधिक नागरिकांनी आयुक्तांना प्रश्न विचारून 380 पेक्षा अधिक नागरिकांनी ट्वीट केले. नागरिकांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांमध्ये वाहतूक, सायबर, गुन्हेगारी समस्यांचा समावेश होता.
एका ट्विटर हँडेलवरून कोयता गँग आणि गुंडगिरीविषयी आयुक्तांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना आयुक्तांनी सांगितले की, मागील चार महिन्यांत 59 शस्त्रे व 276 कोयते जप्त करण्यात आले आहेत. तसेच 135 कुख्यात गुंडांवर मोक्का व एमपीडीए अंतर्गत कारवाई केली आहे. एकाजणाने आपल्या तक्रारीचा फोटो थेट ट्वीट करत या तक्रारीचे पुढे काय झाले, याविषयी आयुक्तांना विचारणा केली. आयुक्तांनीदेखील लगेच संबंधित पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकार्यांचा नंबर देत हे अधिकारी याची दखल घेतील, असे सांगितले.
बुलेटचे फटाके फोडणार्यांना प्रसाद द्या
रात्री दहानंतर बुलेटचे फटाके फोडत जाणार्या बुलेटस्वारांना 'प्रसाद' द्या, असे एकाने सांगितले. त्यावर उत्तर देताना आयुक्त म्हणाले, 'कारवाई जोरात चालू आहे. 'प्रसाद' नाही, पण चालान दिले जात आहे. या वर्षी 350 पेक्षा अधिक जणांवर कारवाई करून सायलेन्सर जप्त केले आहेत.' संदीप शिंदे या ट्विटर हँडलवरून पोलिस दंडात्मक कारवाईवर भर देतात तुम्ही याबाबत काही करणार आहात का, असा प्रश्न विचारला. त्यावर आयुक्तांनी नियमभंग करणार्यांना दंड आणि वाहतूक नियमनासाठी कटिबद्ध!, असे उत्तर दिले.