पुणे : पुढारी वृत्तसेवा : गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात मास्टर माईंड असलेल्या गणेश मारणे, विठ्ठल शेलार याच्यासह 16 जणांविरुद्ध पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले. शरद मोहोळचा 5 जानेवारी रोजी कोथरूडमधील सुतारदरा परिसरात मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी गोळ्या झाडून खून केला होता.
याप्रकरणी गुन्हे शाखेने मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव महिपती कानगुडे, अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, विठ्ठल किसन गांदले, अॅड. रवींद्र पवार, अॅड. संजय उडान, विठ्ठल शेलार, रामदास ऊर्फ वाघ्या मारणे, धनंजय मारुती वटकर, सतीश संजय शेडगे, नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे आणि संतोष दामोदर कुरपे यांना अटक केली आहे.
तपासात गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार हे मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलिस आयुक्तांना सादर करण्यात आला होता. पोलिस आयुक्तांनी प्राप्त कागदपत्रांची पडताळणी करून आरोपींवर मोक्का कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे करत आहेत.
गणेश मारणे फरार
गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात गुंड गणेश मारणे याचे नाव समोर आले आहे. गणेश मारणे हा या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गणेश मारणे सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असून, त्याने अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्जदेखील केला आहे.