पुणे

पिंपरी : पीएमआरडीएचा अर्थसंकल्प आता पुढील आठवड्यात

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अर्थसंकल्प आता पुढील आठवड्यात मांडला जाण्याची शक्यता आहे. बुधवारी (दि. 29) हा अर्थसंकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडण्यात येणार होता. मात्र, खासदार गिरीश बापट यांचे त्या दिवशी निधन झाल्याने मुख्यमंत्री पुण्यात होते. त्यामुळे अर्थसंकल्पाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
पीएमआरडीएचा 2022-23 या आर्थिक वर्षाचा 2 हजार 419 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत मंजूर करण्यात आला होता.

या अर्थसंकल्पामध्ये पुणे विद्यापीठ चौकातील पाडण्यात आलेल्या पुलाच्या ठिकाणी मेट्रोसह एकात्मिक दुमजली उड्डाण पुलाचे बांधकाम करण्यास अंदाजित 277 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली होती. त्याशिवाय, मेट्रो लाइन-3 प्रकल्प, रिंगरोड, पंतप्रधान आवास योजनेतील घरे अशा विविध पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद करण्यात आली होती. दरम्यान,? 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प अद्याप सादर झालेला नाही. या अर्थसंकल्पात कोणते नवीन प्रकल्प मांडले जाणार याविषयी उत्सुकता आहे.

पीएमआरडीएचे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले, पीएमआरडीएच्या अर्थसंकल्पासाठी 29 मार्च ही तारीख ठरली होती. तथापि, त्या दिवशी खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे मुख्यमंत्री पुण्यात होते. त्यामुळे त्यांची वेळ न मिळाल्याने तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांकडून नवीन तारीख मिळाल्यानंतर हा अर्थसंकल्प सादर करण्यात येईल. पुढील आठवडाभरात हा अर्थसंकल्प सादर होऊ शकतो.

SCROLL FOR NEXT