पुणे

PMRDA : 36 कुटुंबांना मिळाले घराचे ताबे..

Laxman Dhenge

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) वाल्हेकरवाडी गृहप्रकल्पात आतापर्यंत 36 कुटुंबांना घरांचे ताबे देण्यात आले आहेत. तर, एकूण 115 जणांनी त्यासाठी पूर्ण पैसे भरले आहेत. दरम्यान, या गृहप्रकल्पातील शिल्लक राहणारी घरे आणि पेठ क्रमांक 12 मधील शिल्लक घरांसाठी पुढील 15 दिवसांमध्ये सोडत काढण्याचे नियोजन आहे. वाल्हेकरवाडी, पेठ क्रमांक 30 व 32 येथे पीएमआरडीएच्या वतीने 792 घरांचा गृहप्रकल्प साकारला आहे. या गृहप्रकल्पात 378 वन रुम किचन आणि 414 वन बीएचके सदनिका आहेत. हा गृहप्रकल्प 2016 मध्येच मंजूर झाला.

त्याच्या कामाची मुदत सप्टेंबर 2019 पर्यंत होती. मात्र, मुदतीत हा प्रकल्प पूर्ण न झाल्याने ठेकेदाराला चार वेळा मुदतवाढ देण्यात आली. दरम्यान, या गृहप्रकल्पातील सर्व सदनिकांसाठी सोडत काढण्यात आली. त्यातील 220 घरांसाठी अर्ज आले. शिल्लक राहिलेल्या घरांसाठी पुढील 15 दिवसांमध्ये सोडत काढण्यात येणार आहे.

पेठ क्रमांक 12 मधील उर्वरित घरांसाठीही सोडत

प्रधानमंत्री आवास योजनेमधील पेठ क्रमांक 12 येथे आर्थिक दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी गृहप्रकल्प उभारला आहे. या गृहप्रकल्पात एकूण 4 हजार 883 घरे उभारण्यात आली आहेत. आर्थिक दुर्बल गटासाठी 3317 तर, अल्प उत्पन्न गटासाठी 1566 सदनिका आहेत. या गृहप्रकल्पात अल्प उत्पन्न गटांसाठी असलेल्या सर्व घरांचे वाटप अद्याप झालेले नाही. येथील शिल्लक राहिलेल्या सदनिकांसाठी पुन्हा नव्याने येत्या 15 दिवसांमध्ये सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.

वाल्हेकरवाडी गृहप्रकल्पात आतापर्यंत 36 नागरिकांना घरांचे ताबे देण्यात आले आहेत. या गृहप्रकल्पातील तसेच पेठ क्रमांक 12 मधील गृहप्रकल्पात शिल्लक राहिलेल्या सदनिकांसाठी पुन्हा नव्याने सोडत काढण्यात येणार आहे. पुढील 15 दिवसांत ही सोडत काढण्याचे नियोजन आहे.

– प्रभाकर वसईकर, जनसंपर्क अधिकारी तथा कार्यकारी अभियंता

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT