PMPML Navratri special bus service 2025
पुणे: नवरात्रोत्सवात पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील देवींची शक्तीस्थळे दर्शनासाठी पीएमपीकडून दोन विशेष पर्यटन बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीबरोबरच ग्रुप बुकिंगमध्ये पर्यटकांच्या मागणीनुसार बससेवा उपलब्ध होणार आहे, तरी या सेवेचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांच्या संकल्पनेतून दि. 23 सप्टेंबर 2025 पासून ही विशेष पर्यटन बससेवा क्रमांक 13 (1) आणि पर्यटन बससेवा क्रमांक 13 (2) सुरू करण्यात येत आहे. भाविकांसाठी उपलब्ध बस ही संपूर्ण वातानुकूलीत स्मार्ट इलेक्ट्रिक असणार आहे. पर्यटक व भाविकांच्या मागणीनुसार तसेच परिवहन महामंडळाचे उत्पन्न वाढीच्या दृष्टीने ही बससेवा सुरू करण्यात आली आहे. (Latest Pune News)
या पर्यटन बसमध्ये बस क्रमांक 13 (1) ही जिल्ह्यातील तळजाई माता मंदिर, पद्मावती मंदिर, कोंढणपूर येथील तुकाई माता मंदिर, पुरंदर तालुक्यातील कोडीत येथील श्रीनाथ मस्कोबा जोगेश्वरी माता मंदिर, शिवरी येथील यमाई माता मंदिर या देवस्थानांचे दर्शन घडविण्यात येणार आहे.
तर या पर्यटन बसमध्ये बस क्रमांक 13 (2) शहरातील महालक्ष्मी मंदिर, सारसबाग, बुधवार पेठ परिसरातील तांबडी जोगेश्वरी मंदिर, चतु:शृंगी माता मंदिर, पिंपरी कॅम्प परिसरातील वैष्णवी माता मंदिर, भवानी माता मंदिर, भवानी पेठेतील भवानी माता मंदिर देवस्थानचे दर्शन यात होणार आहे. त्याचे बुकिंग डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन, स्वारगेट, कात्रज, हडपसर गाडीतळ, पुणे मनपा भवन, भोसरी बसस्थानक, निगडी या पास केंद्रांवरून होईल.
असे असेल पर्यटन बससेवेचे वेळापत्रक
पर्यटन बससेवा क्र. 13 (1)
मार्ग : पुणे स्टेशन - स्वारगेट - तळजाई माता मंदिर, तळजाई - पद्मावती मंदिर, पद्मावती - तुकाई माता मंदिर कोंढणपूर - श्रीनाथ म्हस्कोबा जोगेश्वरी माता मंदिर कोडीत, ता. पुरंदर - यमाई माता मंदिर शिवरी, ता. पुरंदर - स्वारगेट - पुणे स्टेशन.
बस सुटण्याची वेळ : 08:30 (पुणे स्टेशन)
बस पोहचण्याची वेळ : 19:00
प्रति प्रवासी तिकीट दर : 500 रूपये
पर्यटन बससेवा क्र. 13 (2)
मार्ग : पुणे स्टेशन - स्वारगेट - महालक्ष्मी मंदिर, सारसबाग - तांबडी जोगेश्वरी मंदिर, बुधवार पेठ - चतु:शृंगी माता मंदिर, सेनापती बापट रोड - वैष्णवी माता मंदिर, पिंपरी कॅम्प - भवानी माता मंदिर, भवानी पेठ - स्वारगेट - पुणे स्टेशन.
बस सुटण्याची वेळ : 08:30 (पुणे स्टेशन)
बस पोहचण्याची वेळ : 19:00
प्रति प्रवासी तिकीट दर : 500 रूपये