PMPML Bus Pudhari
पुणे

PMPML Diesel Price Hike: डिझेल दरवाढीचा पीएमपीला झटका; महिन्याला 5.40 लाखांचा वाढीव भार

217 डिझेल बसांच्या इंधन खर्चात मोठी वाढ; आधीच तोट्यातील पीएमपीसमोर नवे आर्थिक संकट

पुढारी वृत्तसेवा

पुणे: अमेरिका-इराण-इस्रायल युद्धाचा पीएमपीला मोठा दणका बसला असून, त्यात नुकत्याच झालेल्या इंधन दरवाढीने पीएमपीवर आता पाच लाख 40 हजार रुपयांचा अतिरिक्त बोजा वाढला आहे.

राज्य शासनाच्या नवीन अध्यादेशानुसार डिझेलच्या दरात प्रतिलिटर 3 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे पीएमपीच्या तिजोरीवर दरमहा लाखो रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. आधीच आर्थिक संकटात असलेल्या पीएमपीचे बजेट या दरवाढीमुळे पार कोलमडणार असल्याचे चित्र आहे.

तिजोरीवर महिन्याला 5.40 लाखांचा भार

एका टँकरमागे 36 हजारांची वाढ गृहीत धरल्यास महिन्याला लागणाऱ्या 15 टँकरसाठी पीएमपीला तब्बल 5 लाख 40 हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे. वर्षाचा विचार केला तर हा आकडा 64 लाख 80 हजारांच्या घरात जातो.

आधीच तोट्यात चाललेल्या पीएमपी प्रशासनाला आता या वाढीव खर्चाचा मेळ घालताना नाकीनऊ येणार आहे. एकीकडे प्रवासी सेवा सुधारण्याचे आव्हान असताना दुसरीकडे या इंधन दरवाढीच्या धक्क्यातून पीएमपी स्वतःला कशी सावरते, याकडे आता पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

प्रतिटँकरमागे 36 हजारांची चणचण

पीएमपीच्या ताफ्यात सध्या 217 डिझेलवर चालणाऱ्या बस आहेत. या बससाठी दरमहा सरासरी 15 टँकर डिझेलचा खप होतो. विशेष म्हणजे, एक डिझेल टँकर 12 हजार लिटर क्षमतेचा असतो. प्रतिलिटर 3 रुपयांची वाढ झाल्यामुळे आता एका टँकरमागे पीएमपीएलला 36 हजार रुपये अधिक मोजावे लागत आहेत. म्हणजेच, दरवाढीपूर्वी ज्या एका टँकरची किंमत 10 लाख 92 हजार रुपये होती, ती आता थेट 11 लाख 28 हजार रुपयांवर जाऊन पोहचली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT