पुणे: धावपळीच्या पीएमपी प्रवासात क्षणभराची नजरचूक झाली आणि १० वर्षांचा तेजस बसमध्येच राहिला. काही वेळांतच लहानग्या तेजसचे धास्तावलेले मन आणि आई-वडिलांची तुटणारी आशा... पण, पीएमपीच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे आणि माणुसकीमुळे या कथेचा अंत सुखात झाला. अन् तेजस पुन्हा आई-वडिलांच्या कुशीत सुखरूप पोहोचला.
खराटे कुटुंब चिंचवडकडे जाणाऱ्या बसमधून प्रवास करीत होते. कर्वेनगर येथे अचानक उतरण्याचा निर्णय झाला. चढ-उताराच्या गर्दीत आणि घाईगडबडीत १० वर्षांचा तेजस पुंडलिक खराटे बसमध्येच राहून गेला. बस निघून गेली आणि मुलगा जवळ नाही, हे लक्षात येताच आई-वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली.
मुलगा चुकल्याची माहिती मिळताच बसचे वाहक गणेश रांगडे (बॅच क्र. २९९८), चालक आणि तपासणी पथकाने एका क्षणाचाही विलंब न करता शोधमोहीम सुरू केली. तेजस दिसल्यावर पीएमपी कर्मचाऱ्यांनी अत्यंत प्रेमाने त्याला जवळ घेत धीर दिला. त्याला सुरक्षितपणे कर्वेनगर पोलिस चौकीत नेण्यात आले.
पोलिस उपनिरीक्षक नायकवाडे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून तेजसला त्याचे वडील पुंडलिक खराटे आणि आई सीमा खराटे यांच्या सुखरूप स्वाधीन करण्यात आले.
आपल्या काळजाचा तुकडा सुरक्षित दिसताच आई-वडिलांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले. या कामगिरीबद्दल कोथरूड आगार व्यवस्थापक सचिन वाबळे यांनी वाहक गणेश रांगडे आणि लिपिक नितीन सुरेश पगारे यांचे कौतुक केले.