पुणे

पुणे : ‘बीआरटी’वर 148 बूम बॅरिअर; पीएमपीच्या वाहतुकीला मिळणार वेग

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात असलेल्या 'बीआरटी'वर खासगी वाहनांची घुसखोरी रोखण्यासाठी आणि बीआरटीद्वारे बसची प्रवासी वाहतूक वेगाने होण्यासाठी पीएमपी प्रशासन येत्या काही दिवसांतच 148 बूम बॅरिअर बसविणार आहे. त्यासंदर्भातील काम युद्धपातळीवर सुरू आहे. पुणे शहरातील आणि पिंपरी-चिंचवड शहरातील 7 बीआरटी मार्गावर सध्या पीएमपीची सेवा सुरू आहे. त्याचबरोबर आणखी एका बीआरटी मार्गावर पीएमपीकडून बस सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. त्यानुसार पीएमपीची आता 8 बीआरटीवर सेवा सुरू असणार आहे.

दोन महिन्यांपूर्वी तत्कालीन बीआरटी मॅनेजर दत्तात्रय झेंडे यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागात चार ठिकाणी बूम बॅरिअर बसवून त्याची चाचणी यशस्वी केली. त्यामुळे या उपक्रमाला पीएमपी प्रशासनाकडून तत्काळ हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे.पीएमपीचे सध्याचे बीआरटी मॅनेजर अनंत वाघमारे या बूम बॅरिअरसंदर्भातील काम पाहत आहेत. त्यांनी पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात खासगी वाहनचालकांची घुसखोरी रोखण्यासाठी 148 बूम बॅरिअर बसविण्याचे नियोजन केले आहे. यामुळे हे बूम बॅरिअर बसविल्यानंतर बीआरटीत होणारी खासगी वाहनचालकांची घुसखोरी थांबणार आहे.

बीआरटीवर किती बस?
पिंपरी-चिंचवडमधील बीआरटी मार्ग
अंतर – 45.5 किमी
पुणे शहरातील बीआरटी मार्ग अंतर – 26 किमी
एकूण बीआरटी बस – 1 हजार 525
पीएमपीच्या बीआरटी बस – 668
भाडेतत्त्वावरील बीआरटी बस – 662
ई-बस बीआरटी – 300

असे आहे नियोजन
पुणे शहरात – 48 बूम बॅरिअर
पिंपरी-चिंचवड शहरात – 100 बूम बॅरिअर
शहरातील 'बीआरटी'
1) संगमवाडी ते विश्रांतवाडी
2) येरवडा ते आपलं घर
3) सांगवी फाटा ते किवळे
4) नाशिक फाटा ते वाकड चौक
5) काळेवाडी फाटा ते स्पाईन रोड
6) निगडी ते दापोडी
7) स्वारगेट ते कात्रज
8) दिघी ते आळंदी (प्रस्तावित मार्ग)

बूम बॅरिअरची चाचणी यशस्वी झाली असून, लवकरच पुणे व पिंपरी-चिंचवड भागात 148 बूम बॅरिअर बसविण्यात येणार आहेत. यातील पुण्यात 48, तर पिंपरीत 100 बूम बॅरिअर लवकरच बसविले जातील.
                                                                      – अनंत वाघमारे,
                                                          बीआरटी मॅनेजर, पीएमपीएमएल

SCROLL FOR NEXT