‘पीएमपी’ ची तिकीट दरवाढ पुणेकरांच्या माथी नको Pudhari
पुणे

Pune News: ‘पीएमपी’ ची तिकीट दरवाढ पुणेकरांच्या माथी नको

पीएमपीला होत असलेली संचलन तूट ही दोन्ही महानगरपालिका भरून देत आहे.

प्रसाद जगताप

Pune PMPL News: पीएमपीला होत असलेली संचलन तूट ही दोन्ही महानगरपालिका भरून देत आहे. पीएमआरडीएनेही याबाबतची संचलन तूट भरून द्यावी. तसेच, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला कधीही नफा-तोटा या दृष्टीने पाहू नये. नफ्यात आणण्यासाठी जर तिकीट दरवाढ कराल तर पीएमपीचे प्रवासी कमी होतील. संचलन तूट भरून काढायची असेल, तर पर्यायी व्यवस्था करा, अंतर्गत कामकाज सुधारा, मात्र विनाकारण तिकीट दरवाढ पुणेकरांच्या माथी मारू नका, असे मत पुण्यातील प्रवासी संघटना आणि पीएमपी वाहतूक तज्ज्ञांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केले.

...तर मिळेल पीएमपीला दिलासा

पीएमपीच्या संचलन तुटीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याचा परिणाम पीएमपीच्या वाहतुकीवर होत असून, प्रवाशांनादेखील व्यवस्थितरीत्या बससेवा पुरविताना पीएमपी प्रशासनाला विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. पीएमआरडीए भागात सेवा पुरवण्यामुळे पीएमपीला वर्षाला 187 कोटी 84 लाख 31 हजार 105 रुपयांचा तोटा होत आहे.

या बदल्यात पीएमआरडीएने सन 2022 मध्ये पीएमपीला सुमारे हा तोटा दिला. त्यामुळे खर्च भागवताना त्या वेळी पीएमपीला दिलासा मिळाला. मात्र, आता पीएमपीने मागणी करूनही पीएमआरडीए संचलन तूट देत नाही. दरवर्षी दहा टक्के वाढीने संचलन तूट दिल्यास पीएमपीला आणि प्रवाशांच्या तिकीट दरवाढीला काही प्रमाणात थांबवता येण्याची शक्यता आहे.

‘प्रवासी संख्येनुसार साडेतीन हजार बस सोडा’

पीएमपीच्या ताफ्यातील बस संख्या पुणेकरांच्या लोकसंख्येनुसार असणे आवश्यक आहे. याकरिता महापालिकेच्या सर्वंकष वाहतूक आराखड्यात त्याची माहिती देण्यात आली आहे. त्या आराखड्यानुसार 1 लाख लोकसंख्येसाठी 55 बस आवश्यक असतात. मात्र, पुण्याच्या लोकसंख्येसाठी सध्या आवश्यक तितकी बससंख्या पीएमपीकडे नाही. त्यामुळे पुणेकर प्रवाशांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे.

पुण्याच्या लोकसंख्येनुसार साडेतीन हजारांच्या घरात पीएमपीकडे बस असणे आवश्यक आहे. परंतु, सध्या 1600 च बस मार्गावर असतात. यामध्ये वाढ करावी, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून होत आहे.

‘...पीएमआरडीएसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी’

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील लोकसंख्येसाठी सध्या पूरक बस नाहीत. असे असतानाही पीएमपीकडून पीएमआरडीए भागातही बससेवा पुरवण्यात येत आहे. यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांत आणखीनच बस कमी पडायला लागल्या आहेत. यासोबतच पीएमपीची संचलन तूटदेखील वाढत आहे. वाढती संचलन तूट दोन्ही महापालिकांप्रमाणे पीएमआरडीए प्रशासनाने दरवर्षी पीएमपीला भरून द्यावी.

संचलन तूट मिळत नसेल, पीएमपीने पीएमआरडीए भागातील बससेवा बंद करावी. तसेच, पीएमआरडीएने आपल्या भागातील प्रवाशांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी किंवा पीएमपीची बससेवा पीएमआरडीए भागात सुरू ठेवायची असेल, तर 1 हजार बस, संचलन तुटीतील वाटा आणि पीएमआरडीए भागात डेपो आणि थांब्यांसाठी जागा पीएमआरडीएने द्यावी, असेही मत प्रवासी संघटनांनी व्यक्त केले.

पीएमपीची आर्थिक स्थिती बिकट

पीएमपीची आमदनी अठन्नी आणि खर्चा रुपया... अशी सध्या स्थिती आहे. पीएमपीला महिना उत्पन्न 50 ते 60 कोटी आणि खर्च 110 ते 111 कोटींपर्यंत येत आहे आणि सातव्या वेतन आयोगामुळे आणखी बोजा वाढला आहे. त्यामुळे दोन्ही मनपा आणि पीएमआरडीए प्रशासनाने कोणतीही अट न घालता, मागेल तेव्हा लगेचच संचलन तूट द्यावी, संचलन तुटीसाठी वारंवार मागणी करत बसायला लावू नये, असे मत पीएमपीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या वर्तुळातून व्यक्त केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT