पुणे

पीएमपीचा बेशिस्त चालक बडतर्फ; महिलेला उडविल्याप्रकरणी ‘पीएमपी’ अध्यक्षांची कारवाई

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  'पीएमपी'च्या ई-बस चालकाने आज (दि.11) रोजी सकाळी दहाच्या सुमारास भैरोबानाला चौकात सिग्नलला उभी असलेल्या दुचाकीवरील महिलेला उडविले. त्याच्या या बेशिस्तपणाची चौकशी झाल्यावर अवघ्या तासाभरातच पीएमपीचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी चालकाला बडतर्फ केले आहे.

भेकराईनगर-वारजे माळवाडी- एनडीए गेट (गाडी क्रमांक एमएच 12 टीव्ही 0693) ही गाडी भरधाव वेगाने हडपसरवरून पुण्याच्या दिशेने येत होती. गाडीचा वेग अतिशय जोरात होता. त्यावेळी या बसच्या चालकाने भैरोबा नाला चौकात आल्यावर सिग्नलला उभ्या असलेल्या एका महिलेल्या मागून धडक दिली. महिलेला किरकोळ जखमी झाली असून दुचाकीचे नुकसान झाले आहे.

उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसांनी चालकाला गाडीतून उतरवून पोलिस स्टेशनमध्ये नेले. या घटनेची माहिती पीएमपी अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांना समजताच, त्यांनी बेशिस्त चालक रोहित तानाजी गवळी (बॅच नं.255) याला कामावरून काढून टाकण्याचे आदेश दिले. गवळी हा ठेकेदारांकडील चालक होता. यापूर्वीही ठेकेदारांच्या अनेक चालकांकडून बेशिस्तपणे वर्तन केल्याबाबत पीएमपीकडे तक्रारी आल्या आहेत. या कारवाईमुळे आतातरी पीएमपी चालकांमध्ये काही प्रमाणात वचक बसेल, अशी प्रवाशांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT