खडकवासला: स्वारगेटहून सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याला खानापूरकडे जाणार्या पीएमपी बसला सोमवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास भीषण आग लागली. खडकवासला धरणाजवळील भारतीय लष्कराच्या डीआयडी संस्थेच्या रणगाडा गेटसमोर ही घटना घडली. या आगीत बस जळून खाक झाली. बसचालक फिरोज शेख (वय 40, रा. हडपसर, शिंदेवाडी) यांनी प्रसंगावधान दाखवून बसमधील सर्व 45 प्रवाशांना खाली उतरवल्यामुळे जीवितहानी टळली.
याप्रकरणी फिरोज शेख यांनी हवेली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुपारी सव्वाएक वाजता ही बस स्वारगेटहून खानापूरकडे निघाली होती. खडकवासला धरणमाथा ओलांडल्यानंतर बसच्या इंजिनने पेट घेतला. त्यामुळे चालक शेख यांनी डीआयडीच्या रणगाडा गेटसमोर तत्काळ बस थांबवली. बसमधील सर्व प्रवासी खाली उतरल्यानंतर काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. नांदेड सिटी अग्निशमन दलाचे जवान येईपर्यंत अर्ध्या तासात बस जळून खाक झाली. बसमधील सर्व प्रवासी खानापूर, मणेरवाडी, डोणजे, गोर्हे भागांतील होते.
माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे म्हणाले की, या दुर्घटनेस पीएमपी प्रशासन जबाबदार आहे. खानापूर, सिंहगड, पानशेत मार्गांवर जुन्या मोडकळीस आलेल्या बस पाठवल्या जातात. त्यामुळे अशा घटना घडत आहेत. अशा घटना टाळण्यासाठी दूर अंतराच्या मार्गांवर सुस्थितीतील बस पाठवाव्यात.
आगीचे नेमके कारण आद्यप समजू शकले नाही. याप्रकरणी चौकशी सुरू आहे. बसचालकाच्या म्हणण्यानुसार इंजिनने पेट घेतल्यामुळे ही आग लागली. मात्र, याबाबत परिवहन विभागाकडून तांत्रिक माहिती घेऊन तपास केला जात आहे.- अतुल भोस, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, नांदेड सिटी पोलिस ठाणे