महापालिकेच्या पथ विभागाचा अजब कारभार; कोल्डमिक्स टाकून पावसातच बुजवले खड्डे  Pudhari
पुणे

Pune Potholes: महापालिकेच्या पथ विभागाचा अजब कारभार; कोल्डमिक्स टाकून पावसातच बुजवले खड्डे

पाऊस पडल्यावरच अधिकार्‍यांना जाग

पुढारी वृत्तसेवा

PMC road repair work in monsoon

पुणे: शहरात सोमवारी (दि.18) मुसळधार पाऊस झाला. या पावसाने महापालिकेच्या कामांची पुन्हा एकदा पोलखोल केली आहे. भर पावसात अशास्त्रीय पद्धतीने खड्डे बुजवण्याचा प्रताप पथविभागाच्या कर्मचार्‍यांनी केला. काही ठिकाणी तर पाणी न काढताच त्यात कोल्डमिक्स टाकून खड्डे बुजवण्यात आल्याने कामाच्या दर्जावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

महापालिकेमार्फत दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून रस्त्यांची कामे केली जातात. मात्र, रस्त्यांची कामे करताना कामाचा दर्जा राखला जात नाही. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले. या खड्ड्यांची दुरुस्ती तातडीने करण्यासाठी महापालिकेच्या पथ विभागाने पथके नेमली आहेत.  (Latest Pune News)

मात्र, पावसाने विश्रांती घेऊनही खड्डे दुरुस्तीचे काम संथगतीने सुरू होते. पावसाने उघडीप दिल्यानंतरही अनेक रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात आलेले नव्हते. त्यात सोमवारी मोठा पाऊस झाल्याने अनेक खड्डे पुन्हा उघडे पडले. भर पावसात हे खड्डे बुजवण्याचा प्रयत्न पथ विभागाच्या कर्मचार्‍यांनी केला.

शास्त्रोक्त पद्धतीने खड्डे बुजवण्याचा दावा फोल

रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे पथ विभागाच्या कर्मचार्‍यांनी भर पावसात खड्डे बुजवण्यास सुरुवात केली. पावसाळ्यात खड्डे बुजवण्यासाठी कोल्डमिक्सचा वापर केला जातो. मात्र, हा माल वापरण्यासाठी पाणी काढणे गरजेचे असते.

शहरातील खड्डे हे शास्त्रोक्त पद्धतीने भरले जातील, असा दावादेखील पालिकेने केला होता. मात्र, खड्ड्यातील पाणी न काढताच हे खड्डे भरण्यात आले. मित्र मंडळ चौकात पाणी साचलेल्या ठिकाणी कोल्डमिक्स टाकून रस्ते समतल करण्यात येत होते. मात्र, पाणी न काढताच कोल्डमिक्स टाकून रस्ता समतल केला जात होता. या बाबत ठेकेदाराने उडवाउडवीची उत्तरे दिली.

अशा पद्धतीने जर खड्डे बुजवले जात असतील तर ते चुकीचे आहे. याबाबत संबंधित क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकार्‍याला ठेकेदारावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
- अनिरुद्ध पावसकर, पथ विभाग प्रमुख, महानगर पालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT