Amit Shah Pudhari
पुणे

Amit Shah Pune Visit: अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी रस्‍त्‍यांची 'तातडीची डागडुजी'; महापालिका प्रशासनाची धावपळ

विमानतळ ते महर्षीनगर मार्ग खड्डेमुक्त करण्याचे आयुक्तांचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शनिवारी (ता. १) होणाऱ्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने शहरातील प्रमुख रस्त्यांची डागडुजी हाती घेतली आहे. शहा यांच्या ताफ्याचा संभाव्य मार्ग असलेले रस्ते खड्डेमुक्त करण्याबरोबरच पॅचवर्कमुळे निर्माण झालेली असमानता दूर करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. रस्त्यांची स्वच्छता, अतिक्रमण हटवणे आणि वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या बाबी दूर करण्याचेही आदेश दिले आहेत.

टिळक स्मारक न्यासाच्या वतीने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार अमित शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध नेते पुण्यात उपस्थित राहणार आहेत.

शहा यांच्या दौऱ्याला काँग्रेसने विरोध दर्शवला असून, त्याला भाजपकडूनही प्रत्युत्तर देण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरणाबरोबरच सुरक्षा यंत्रणांचीही तयारी वाढली आहे.

शहरातील अनेक रस्त्यांची पावसामुळे दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले असून, पॅचवर्कमुळे रस्त्यांची पातळीही असमान झाली आहे. परिणामी वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयुक्तांनी बुधवारी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

शहा यांच्या ताफ्याच्या विमानतळापासून महर्षीनगरपर्यंतच्या संभाव्य मार्गावर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. या मार्गावरील खड्डे बुजविणे, रस्त्यावरील पॅचवर्क व्यवस्थित करणे आणि संपूर्ण मार्ग सुस्थितीत आणण्यासाठी आवश्यक ती कामे तातडीने पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे. संबंधित विभागांनी ही कामे युद्धपातळीवर करण्याचे निर्देशही देण्यात आले.

सारसबागेवरही प्रशासनाचे लक्ष

दरम्यान, १ ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती असल्याने सारसबाग परिसरात विविध कार्यक्रम होणार आहेत. पुणे दौऱ्यात अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री शहा सारसबागेत जाण्याची शक्यता आहे. मात्र, हा कार्यक्रम अद्याप निश्चित झालेला नाही.

शहा यांचा सारसबागेतील कार्यक्रम निश्चित झाल्यास शेवटच्या क्षणी प्रशासनाची धावपळ होऊ नये, यासाठी या परिसरातील तयारीलाही महापालिकेने सुरुवात केली आहे. सारसबाग, स्वारगेट आणि व्होल्गा चौक परिसरातील रस्ते सुस्थितीत ठेवण्याबरोबरच सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT