खडकवासला: वडगाव बुद्रुक येथील महापालिकेच्या शरदचंद्र पवार इंग्रजी माध्यमाच्या ई-लर्निंग स्कूलमध्ये वर्गखोल्या नसल्याने इयत्ता नववी आणि दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
दुसरीकडे लाखो रुपये खर्च करून मुलांच्या शिक्षणासाठी बांधण्यात आलेल्या इमारतीच्या चार वर्गखोल्या आणि तळमजल्यात महापालिकेचा छापखाना (प्रेस) सुरू आहे. (Latest Pune News)
या शाळेतील बहुतेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना खासगी शाळांमध्ये भरमसाट फी देऊन प्रवेश घेता आला नाही. त्यामुळे शंभराहून अधिक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका आहे.
वर्गखोल्या तसेच पुरेशी जागा उपलब्ध असूनही या ठिकाणी महापालिकेचा छापखाना सुरू असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या शाळेत तातडीने नववी आणि दहावीचे वर्ग सुरू करण्यात यावेत; अन्यथा विद्यार्थी आणि पालकांसह शाळेसमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा खडकवासला राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष काकासाहेब चव्हाण यांनी दिला आहे. याबाबत चव्हाण यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.
या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते आठवीचे वर्ग सुरू आहेत. मात्र नववी आणि दहावीच्या शिक्षणाची सोय नाही. चव्हाण म्हणाले की, याबाबत वारंवार विनंत्या करून प्रशासन सुस्त आहे. नवीन शैक्षणिक वर्ष 16 जून रोजी सुरू झाले आहे. मात्र अद्याप नववी आणि दहावीच्या वर्गांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली नाही. त्यामुळे शेकडो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची धोका निर्माण झाला आहे.
शिक्षणहक्क कायद्याचा प्रशासनाला विसर
गोरगरीब, कष्टकरी मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचा कायदेशीर हक्क डावलून शाळेच्या वर्गखोल्यात महापालिकेचा छापखाना सुरू आहे. प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. घटनेने दिलेल्या शिक्षणहक्क कायद्याचा महापालिकेला विसर पडला आहे. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पालकांनी सांगितले.
शरदचंद्र पवार ई लर्निंग स्कूलमध्ये अद्यापही नववी आणि दहावीचे वर्ग सुरू झाले नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या माझ्यासारख्या पालकांना खासगी शाळांचे भरमसाठ शुल्क परवडत नाही. प्रशासनाने तातडीने हे वर्ग सुरू होण्यासाठी कार्यवाही करावी.-सचिन भालेकर, पालक
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी काळजी घेतली जाईल. याबाबत संबंधित विभागाला तातडीने सूचना देऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.-प्रज्ञा पोतदार, सहायक आयुक्त, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय