पुणे

Pune News : पालिकेच्या रुग्णालयांत अनारोग्य सेवा! सामान्य नागरिकांची हेळसांड

अमृता चौगुले
पुणे; पुढारी वृत्तसेवा : खासगी रुग्णालयातील दर आवाक्याबाहेरील असल्याने आर्थिकदृष्ट्या मागास वर्गासाठी महापालिकेची रुग्णालये संजीवनी देणारी आहेत. त्यामुळेच या रुग्णालयांमध्ये नागरिकांची गर्दी होत आहे. मात्र, त्या तुलनेत दिली जाणारी सुविधा अत्यंत तोकडी आहे. गर्दीच्या तुलनेत डॉक्टरांचे प्रमाण नगण्य असल्याने तणावात वावरणारे वैद्यकीय अधिकारी हे येथील विदारक वास्तव आहे.
कुत्री, मांजर, कोंबड्यांचा रुग्णालयातील मुक्त वावर हा येथील व्यवस्थेतील ढिसाळपणा दाखवून देतो. पाण्यासारखी मूलभूत सुविधाही काही रुग्णालयांत नव्हती. स्वस्तात उपचार घेणारे रुग्ण म्हणून त्यांच्या वेळेची किंमत शून्य असल्याचे चित्र रुग्णालयात दिसून येते. उपचार घेण्यापासून ते औषध मिळविण्यापर्यंत रुग्णांना ताटकळत बसावे लागते. पुण्यासारख्या देशातील महत्त्वाच्या शहरातील आरोग्य सेवेच्या गुणवत्तेचे विदारक चित्र  दै. 'पुढारी'ने केलेल्या पाहणीत दिसून आले.
खासगी दवाखान्यात डिलिव्हरीकरता अ‍ॅडमिट केलं, तर गरज नसतानापण सिझेरियन करतात. त्यामुळं त्या आईला त्रास होतोच; पण दुसरीकडं घरातल्या कर्त्या माणसाचा खिसाही खाली होतो. कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये मात्र डिलिव्हरी अन् बाळावरचे सर्व उपचार मोफत होतात, त्यामुळंच मी म्हणते की, खासगीपेक्षा  कमला नेहरूच बरंय…,ङ्घ असे शब्द आहेत फैयाज शेख यांचे.
कमला नेहरू रुग्णालय हे महापालिकेचे असून, शहरातील रुग्णांसाठी महत्त्वाचे आहे. या रुग्णालयात पुणे महापालिकेचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यायल संलग्न करण्यात आले. त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर उपलब्ध होत आहेत. दररोज 700 ते 800 बाह्य विभागात रुग्ण येतात. रुग्णालयात प्रसूती आणि अस्थिरोग विभागात रुग्ण गर्दी करतात.
नावनोंदणीसाठी चार खिडक्या असून, सकाळी दहा वाजता येथील कर्मचारी रुग्णांची वाट बघत होते. आलेले रुग्ण नाव नोंदवून ते तळमजल्यावरच असलेल्या औषधशास्त्र, अस्थिरोग, शल्यचिकित्सक, मानसोपचार विभागात जात होते. सकाळी गर्दी कमी असल्याने अवघ्या काही मिनिटांत केसपेपर मिळत होता. त्यानंतर डॉक्टरांकडेही नंबर लवकर येत होता. सकाळी अकरा वाजल्यानंतर औषधशास्त्र आणि अस्थिरोग विभागात रुग्णांच्या रांगा लागल्याचे दिसून आले.

कमला नेहरू रुग्णालय

वेळ : सकाळी 10.30… खिडकी क्रमांक 1 वरील रांग वाढते… दहा रुपये भरून केसपेपर काढल्यावर सर्दी, खोकला, ताप यासाठी पाच क्रमांकाच्या ओपीडीमध्ये रुग्णांची जास्त गर्दी दिसते… कर्मचारी रुग्णांना कोणत्या ओपीडीमध्ये जायचे, यासाठी मदत करताना दिसतात. मात्र, मेडिसीन ओपीडीमध्ये शिकाऊ डॉक्टरांची संख्या जास्त दिसते. पंधरा मिनिटे प्रतीक्षा केल्यानंतर नंबर आला. डॉक्टरांनी काय होतेय, असे विचारले. त्यानंतर आठ नंबरच्या खिडकीतून गोळ्या आणि औषध घेण्यास सांगितले.

जमेच्या बाजू काय?

  • बसण्याची व्यवस्था : रुग्णालयातील सर्व ओपीडी विभागांमध्ये रुग्णांना बसण्यासाठी पुरेशी आसनव्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.
  • मदत : पहिल्यांदाच येत असलेल्या रुग्णांना कर्मचारी आपणहून मदत करतात. केसपेपर कुठे काढायचा, कोणती ओपीडी कुठे आहे, औषधे कोठे मिळतात, याबद्दल मार्गदर्शन करीत असल्याचे दिसले.
  • स्वच्छता : रुग्णालयात स्वच्छता राखली असल्याचे दिसून आले. त्यामुळे एरव्ही सरकारी रुग्णालयांमध्ये श्वास दडपून टाकणारा उग्र वास येत नसल्याचे जाणवले.
  • डॉक्टरांची संख्या वाढणार : सध्या बर्‍याच ओपीडीमध्ये शिकाऊ डॉक्टर दिसत असले, तरी डॉक्टरांची रिक्त पदे भरली जाणार असून, त्यासाठी मुलाखती सुरू करण्यात आल्या आहेत.

मनुष्यबळाची कमतरता

कमला नेहरू रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता असल्याचे दिसून आले. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळावर ताण निर्माण होत आहे. रुग्णालयात सुरक्षारक्षक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी अरेरावी करीत असल्याच्या तक्रारी पूर्वी मोठ्या प्रमाणात केल्या जायच्या. मात्र, आता बहुतांश सुरक्षारक्षकांची बदली झाल्याने सध्याचे कर्मचारी रुग्णांना मदत करताना दिसून येत आहेत. क्लास-1 डॉक्टरपासून चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांपर्यंत असलेली रिक्त पदे भरल्यास कमला नेहरू रुग्णालयातील आरोग्यसेवा आणखी सुरळीत होऊ शकते.

कमला नेहरू रुग्णालयात इंडिया विरुध्द भारत

कमला नेहरू रुग्णालयात प्रसूती आणि बालरोग वगळता इतर बहुतांश आरोग्य सुविधा खासगी कंपन्यांना चालवायला देण्यात आल्या आहेत. प्रामुख्याने आयसीयू, कार्डिअ‍ॅक सेंटर, डायलिसिस सेंटर, रेडिऑलॉजी विभाग पीपीपी तत्त्वावर चालविले जात आहेत. खासगीकरण करण्यात आलेल्या विभागांना कॉर्पोरेट लूक देण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णालयातील इतर विभाग आणि खासगीकरण करण्यात आलेल्या विभागांमधील फरक स्पष्टपणे दिसून येतो. पीपीपी तत्त्वावरील सुविधा खासगी रुग्णालयांच्या तुलनेत निम्म्या किमतीत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

औषधांची खिडकी उघडण्यास उशीर

रुग्णालयात खिडकी क्रमांक 8 येथे औषधे, गोळ्या मोफत मिळतात. औषधांच्या खिडकीची वेळ सकाळी 9.30 ते 1 आणि 1.30 ते 5 अशी आहे. मात्र, जेवणाच्या सुटीनंतर खिडकी 1.30 ऐवजी 2 वाजता उघडण्यात आली आणि पावणेपाचला बंद करण्यात आली.
घरातील कुणालाही डॉक्टरची गरज पडली, खासकरून सर्दी, खोकल्यासारख्या आजारांसाठी आम्हाला सुतार दवाखान्याशिवाय  पर्याय नाही. इथल्या डॉक्टरांच्या उपचाराने लवकर फरक पडतो. मागील पंधरा ते वीस वर्षांपासून या दवाखान्यात माझं येणं होतं. पूर्वीपेक्षा आता खूपच चांगल्या सुधारणा झाल्यात, शिवाय डॉक्टर चांगले असल्यानं समाधान मिळतं, हे शब्द आहेत महादेव कारागीर यांचे.

महापालिकेच्या रुग्णालयांत अनारोग्य सेवा!

कोथरूड येथील कै. जयाबाई सुतार दवाखान्यात जाण्यासाठी भाजी मार्केटशेजारून गेल्यानंतर समोर सुतार दवाखान्याची चकाचक काचेची इमारत दिसते. प्रवेशद्वारावर गेल्यानंतर सुरक्षारक्षकाला हटकले. आत गेल्यानंतर एका खासगी संस्थेकडून चालविण्यात येणार्‍या विविध तपासणी केंद्रामध्ये जाता येते. या ठिकाणी असलेल्या तपासण्या कमी दरामध्ये केल्या जातात. जनरल ओपीडीसाठी जाणार्‍या रुग्णांना इमारतीच्या मागे वाहनतळापासून चालत जावे लागते.

एका खिडकीमध्ये केसपेपरसाठी रांग होती, समोर रुग्णांना बसण्यासाठी बैठकव्यवस्था करण्यात आली होती. तिथं भेटलेला हिमांशू पाटील हा विद्यार्थी म्हणाला, मी शिक्षणानिमित्त येथे राहतो, खासगीमध्ये जाण्यापेक्षा सुतार दवाखान्यातच माझ्यासोबतचे अनेक मित्र येथे येतात. आज गर्दी कमी आहे, केसपेपर काढण्यासाठी मोठी गर्दी असते.

केसपेपर घेतल्यानंतर आतमध्ये डॉक्टर रुग्णांची तपासणी करीत होते. गर्दी कमी असल्याने थेट डॉक्टारांकडे गेल्यानंतर लगेचच डॉक्टर चौकशी करून औषधे लिहून देत होते. डॉक्टरांच्या समोरील बाजूला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था. औषधे घेण्यासाठी इमारतीसमोरील बाजूने डाव्या बाजूला गेल्यानंतर औषधालय. औषधे देणारा स्टाफ रुग्णांशी चर्चा करून औषधे देत होता. औषधालयापासून बाहेर आल्यानंतर खासगी संस्थेकडून तपासणी करून घेण्यासाठी आलेल्या नागरिकांची गर्दी होती.

एकीकडे चकाचक, तर दुसरीकडे सर्वसाधारण

सुतार दवाखान्यामध्ये खासगी संस्थेकडून सुरू असलेल्या तपासणीच्या ठिकाणी इमारत एकदम चकाचक ठेवण्यात आली आहे. खासगी सुरक्षारक्षक देखील ठिकठिकाणी उभे असतात. बसण्याची व्यवस्था देखील चांगल्या दर्जाची; पण पाठीमागे महापालिकेच्या जनरल ओपीडीमध्ये एकदम साधारणपणा जाणवतो. एकाच इमारतीमध्ये हे दोन फरक स्पष्ट जाणवतात.

कमी दरात होतात चाचण्या…

सीटी स्कॅन, एक्स-रे, एमआरआय, सोनोग्राफी, हृदयासंदर्भात देखील कमी दरामध्ये सुतार दवाखान्यात तपासण्या केल्या जात आहेत. लिक्विड प्रोफाईल याच्यासह रक्तांच्या विविध चाचण्या ज्यामध्ये रक्तातील साखर, हिमोग्लोबीन यांसह संसर्गजन्य आजारांचे निदान करण्यासाठी करण्यात येणार्‍या सर्व चाचण्या सुतार दवाखान्यात कमी दरामध्ये केल्या जातात.

राजीव गांधी रुग्णालय :

चार मजली इमारत; मात्र वैद्यकीय सुविधांचा अभाव तहान लागली; पण प्यायला पाणीच नाही… लिफ्टने जायचेय; पण ती येतच नाही… तपासणीसाठी आलोय; पण डॉक्टर आणखी आलेच नाही. फेकलेल्या गोळ्या घ्यायच्या अन् पातळ औषधांसाठी बाहेर जाऊन बाटली शोधायची… अशा एक ना अनेक अडचणींना भारतरत्न राजीव गांधी रुग्णालयातील रुग्णांना सामोरे जावे लागत आहे. येरवडा येथील मुख्य चौकात असलेल्या चार मजली रुग्णालय भव्य व सुसज्ज असले तरी वैद्यकीय सुविधा मिळविण्यासाठी ते सक्षम नसल्याचे चित्र आहे.

रुग्णालयात आल्यानंतर कोठे जायचे असल्यास त्याची माहिती देण्यासाठी चौकशी कक्ष उभारण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात कक्षाव्यतिरिक्त तेथे कोणी दिसून येत नाही. कोणत्याही विभागाची चौकशी करायची असेल, तर तेथील सुरक्षारक्षक अथवा मावशींकडे विचारणा करावी लागते. रुग्णालय नऊ वाजता सुरू होते. मात्र, केसपेपर व ओपीडीमधील डॉक्टर सोडले तर अन्य विभागांत मात्र दहानंतरच डॉक्टरची वाट पाहावी लागत असल्याचे दिसून आले. चार मजली रुग्णालयात दोन मोठ्या लिफ्टची सुविधा देण्यात आली आहे. मात्र, त्यांचा वेग कमी व सोयीनुसार बंद ठेवण्यात येत असल्याने चिमुकल्यांसह ज्येष्ठ नागरिकांनाही नाइलाजास्तव जिना चढून जावे लागते. रुग्णालयातील रुग्णांना पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी चांगलीच दमछाक करावी लागते.

कारण, पिण्याच्या पाण्याच्या फलकाव्यतिरिक्त रुग्णालयात पाणी अथवा प्युरिफायर दिसून येत नाही. काही ठिकाणी आहेत; मात्र तेही अपुरे असल्याने रुग्णांसह नातेवाइकांना पाण्यासाठी शोध मोहीम राबवावी लागत आहे. दुपारनंतर एक ते दीड असा वेळ जेवणासाठी ठेवण्यात आला आहे. मात्र, सव्वादोन वाजल्यानंतरही डॉक्टर न आल्याने रुग्णांना ताटकळत बसावे लागते. एकंदरीत, रुग्णालयात प्रत्येक
गोष्टीत कमतरता असल्याचे दिसून येते.

इमारतीच्या पॅसेजमध्ये रुग्णांची तपासणी

भव्य इमारत असलेल्या रुग्णालयात पॅसेजमधील कट्ट्यावर बसून प्रशिक्षित डॉक्टरांकडून तपासणी करण्याचे काम सुरू होते. स्त्री व पुरुषांची एकत्रच तपासणी होत असल्याने महिलावर्गाला या ठिकाणी तपासणी करणे अडचणीचे वाटत असल्याचे रुग्णांकडून सांगण्यात आले.

भटकी कुत्री, मांजरी अन् कोंबड्या

रुग्णालयाच्या आवारात भटकी कुत्री, मांजरी अन् कोंबड्यांचा सर्रास वावर दिसून येतो. जनावरे रुग्णालयाच्या मजल्यांवर येऊ नयेत, यासाठी लाल रंगाच्या पाण्याच्या बाटल्या जिन्यावर ठेवण्यात आल्या आहेत. रुग्णांच्या बसण्याच्या जागेवर भटक्या कुत्री व मांजरांनी मुक्काम ठोकला असून, त्यांना तेथून हाकलण्याची तसदीही घेतली जात नसल्याचे चित्र आहे.

थंडी-तापामुळे औषध घ्यायला आले आहे. मात्र, दोन वाजले तरी अजून कोणी नाही. जेवणाची वेळ दीडपर्यंत आहे. आत्ता दोन वाजून गेले. सरकारी दवाखान्यात उशीर हा ठरलेलाच आहे. वेळेत कोणत्याच गोष्टी कधी होत नाहीत.

– सरूबाई कांबळे

पहिल्यांदाच या दवाख्यान्यात आलो आहे. थुंकीचे नमुने द्यायचे आहेत. सकाळी नऊ वाजता दवाखाना उघडल्यानंतर आलो असून, दहा वाजता डॉक्टर येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे डॉक्टरांची वाट बघण्याखेरीज काही पर्याय नाही.

– जतीन शहा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT