पुणे: शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची तक्रार आता थेट मोबाईलवरून अॅपवर करता येणार आहे. विशेष म्हणजे, तक्रार आल्यानंतर 48 ते 72 तासांत हा खड्डा बुजविण्याची कार्यवाही केली जाणार आहे. महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी यासंबंधीची माहिती दिली.
पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे हे आता नेहमीचेच झाले आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन तर करावा लागतोच; शिवाय खड्ड्यांमुळे वाहतूक संथ होऊन वाहतूक कोंडीच्या प्रश्नाला सामोरे जावे लागते. शहरातील अनेक भागातील रस्त्यांवर पावसाळ्यात खड्डे पडतात. (Latest Pune News)
मात्र, हे खड्डे बुजविण्याची कार्यवाही महापालिकेकडून तत्परतेने होत नसल्याची नागरिकांची ओरड असते. या पार्श्वभूमीवर नागरिकांना त्यांची रस्त्यांवरील खड्ड्यांची तक्रार थेट महापालिकेकडे करता यावी आणि त्यावर तत्काळ कार्यवाही व्हावी, यासाठी आता महापालिकेने स्वतंत्र अॅप विकसित केले आहे.
‘पीएमपी रोडमित्र’ असे या अॅपचे नाव आहे. आयुक्त राम यांनी याबाबत माहिती दिली. येत्या आठवड्यात हे अॅप सुरू करण्यात येणार असून, सद्य:स्थितीला अँड्रॉइडवर हे अॅप चालण्याची सुविधा असून, ते आय फोनवर वापरता येण्यासाठीची कार्यवाही सुरू असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
...अशी करता येणार खड्ड्यांची तक्रार
महापालिकेने तयार केलेले ‘पीएमसी रोडमित्र’ हे अॅप मोबाईलवर डाऊनलोड केल्यानंतर त्यात मोबाईल नंबर टाकल्यानंतर संबंधित व्यक्तीला पासवर्ड येईल. त्यानंतर खड्ड्यांचा फोटो काढण्यासाठी अॅक्सेस मिळेल. त्यावर
संबंधित नागरिकाने खड्ड्यांचा फोटो काढल्यानंतर रिअल टाइम अक्षांश व रेखांश येईल तसेच हा खड्डा कोणत्या टाईपचा आहे, यासंबंधीचे तीन पर्याय येतील. हा पर्याय निवडल्यानंतर महापालिकेच्या संबंधित विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याला खड्ड्यांचा फोटो जाईल व तक्राराला त्यासंबंधीचा मेसेज जाईल. त्यानंतर संबंधित कनिष्ठ अभियंत्याने 48 ते 72 तासांच्या कालावधीत खड्डा बुजविण्याची कार्यवाही करून बुजविलेल्या खड्ड्यांचा फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर खड्डा बुजविल्याचा मेसेज तक्रारदाराला जाणार आहे.