naval kishore ram Pudhari
पुणे

Pune Cyber Investigation: आयुक्तांना आलेला वादग्रस्त मेसेज 'फेक'च? सायबर चौकशीची मागणी

स्थायी समिती अध्यक्षांचा दावा चर्चेत; निलंबित अभियंत्याच्या मेसेजवर नवे वळण

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना वादग्रस्त मजकूर असलेला मेसेज पाठवल्याप्रकरणी अधीक्षक अभियंता असित जाधव यांचे तातडीने निलंबन करण्यात आले. मात्र, या प्रकरणाला गुरुवारी (दि १६) स्थायी समितीच्या बैठकीत अनपेक्षित वळण मिळाले.

आयुक्तांना पाठविण्यात आलेला मेसेज 'फेक' असू शकतो, अशी शक्यता व्यक्त करत त्याची सायबर पोलिसांमार्फत चौकशी करण्याची सूचना स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी केली. या भूमिकेमुळे संपूर्ण प्रकरणाबाबत नव्याने चर्चा सुरू झाली असून, संबंधित अधिकारी आणि दलालांना वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचीही चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.

गेल्या महिन्यात महापालिकेतील अधीक्षक अभियंते आणि कार्यकारी अभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये अधीक्षक अभियंता असित जाधव यांची पथ विभागातून पाणीपुरवठा विभागात बदली झाली.

ही बदली मान्य नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर ते जवळपास महिनाभर रजेवर गेले. या काळात त्यांची बदली रद्द व्हावी, यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न झाल्याची चर्चा होती. मात्र, आयुक्त नवल किशोर राम यांनी बदलीचा निर्णय कायम ठेवला.

दरम्यान, शनिवारी (दि ११) असित जाधव हे आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांची भेट न झाल्याने त्यांनी तेथूनच आयुक्तांना मोबाईलवर मेसेज पाठविला. या मेसेजमध्ये आयुक्तांविषयी आक्षेपार्ह आणि अयोग्य शब्दांचा वापर करण्यात आल्याचे सांगितले जाते.

मेसेज पाहताच आयुक्त राम यांनी तो महापालिकेतील विभागप्रमुखांच्या अधिकृत ग्रुपवर पाठविला आणि अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांना जाधव यांच्या निलंबनाचे आदेश तत्काळ काढण्याचे निर्देश दिले.

थेट अधीक्षक अभियंत्यावरील या कारवाईमुळे महापालिका प्रशासनात मोठी खळबळ उडाली. दरम्यान, जाधव यांची बदली तसेच निलंबन रद्द व्हावे, यासाठी काही राजकीय नेते, अधिकारी आणि खासगी व्यक्तींकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र, शिस्तभंगाच्या अशा प्रकाराकडे दुर्लक्ष केले जाणार नाही, अशी भूमिका आयुक्त राम यांनी यापूर्वीच स्पष्ट केली होती.

असे असताना, गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. आयुक्तांना प्राप्त झालेला मेसेज बनावट (फेक) असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे या मेसेजची सत्यता तपासण्यासाठी सायबर पोलिसांकडे तक्रार करून सखोल चौकशी करावी, अशी सूचना स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी केली.

भिमाले म्हणाले, "आयुक्तांना आलेला मेसेज फेक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणात सायबर पोलिसांकडून चौकशी व्हावी, अशी सूचना प्रशासनाला करण्यात आली आहे.

" स्थायी समितीत झालेल्या या भूमिकेमुळे आधीच गाजत असलेल्या निलंबन प्रकरणात आता संदेशाच्या सत्यतेचाच मुद्दा केंद्रस्थानी आला असून, पुढील चौकशीत नेमके काय समोर येते, याकडे महापालिका प्रशासनासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

मेसेज करणारा ताब्यात

आयुक्तांना मेसेज करणारा संबंधित व्यक्ती हा गुरुवारी महापालिकेत फिरत होता. या बाबत महापालिकेच्या सुरक्षारक्षकांना माहिती मिळाली असता, त्यांनी ताब्यात घेतले. यानंतर त्याला थेट शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नेण्यात आले असून, पुढील कारवाई सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT