पुढारी ऑनलाईन डेस्क
मुसळधार पावसाच्या (Pune Rains) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा (दि. २६) पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. याबाबतची माहिती एएनआय वृत्तसंस्थेने X वर पोस्ट करत दिली आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सलग चौथ्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे. अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे नागरिकांसह वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग मुंबई यांनी वादळ आणि विजेच्या कळकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या अतिदक्षतेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांतील सर्व शाळा व महाविद्यालयांना आज (गुरुवारी) सुट्टी देण्यात आली आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (दि.२६) बहुप्रतीक्षित सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मार्गाचे उद्घाटन आणि स्वारगेट ते कात्रज भूमिगत मार्गाची पायाभरणी होणार होती. दरम्यान, यासह आणखी दहा प्रकल्पांचे उद्घाटनाचा कार्यक्रम नियोजित होता. पण पावसामुळे पीएम मोदी यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे.
पुणे शहरासह जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड भागात सलग चौथ्या दिवशी विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने दाणादाण उडवून दिली. या पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. तसेच शिवाय रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांत पाणी साठल्याने वाहनचालकांची चांगलीच दैना उडाली आहे. दरम्यान, २८ सप्टेंबरपर्यंत शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.