पुणे

’पीएम किसान’चे मानधन पोस्टात मिळणार वेळेवर

अमृता चौगुले

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा :  वेल्हे तालुक्यातील लाभार्थ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पोस्ट कार्यालयात मिळणारे मानधन आता वेळेवर मिळणार आहे. याबाबत टपाल विभागाने संबंधित पोस्ट कार्यालयाला शेतकर्‍यांना वेळेवर मानधन देण्यासाठी पुरेसे पैसे उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

'पीएम किसान योजनेंतर्गत पैसे काढण्यासाठी टपाल कार्यालयात गर्दी' असे वृत्त दै. 'पुढारी'मध्ये प्रसिद्ध झाले होते. पोस्टात पुरेसे पैसे नसल्याने शेतकर्‍यांना मानधनाचे पैसे काढण्यासाठी हेलपाटे मारावे लागत असल्याकडे माजी जिल्हा परिषद सदस्य व भाजपचे वेल्हे तालुकाध्यक्ष आनंद देशमाने यांनी टपाल खात्याचे लक्ष वेधले होते. 'पीएम किसान'च्या बहुतांश लाभार्थ्यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वेल्हे तसेच इतर शाखांमध्ये मानधन मिळत होते. ते आता पोस्टाच्या कार्यालयात मिळत आहे.
वेल्हा तालुक्यातील विविध गावांतील टपाल कार्यालयात शेतकर्‍यांनी नव्याने खाते उघडले आहे. 'पीएम किसान'चा हप्ता खात्यात जमा झाल्याचे मेसेज शेतकर्‍यांना दिले जातात. शेतकर्‍यांची गैरसोय होऊ नये यासाठी पोस्टात पुरेसे पैसे उपलब्ध करण्यासाठी पुणे विभागाचे अधीक्षक बी. पी. एरंडे यांनी सूचना दिल्या आहेत.

मानधनासाठी दूरच्या पोस्टात धाव
पानशेत भागातील निगडे मोसे, ओसाडे आदी गावातील वयोवृद्ध शेतकर्‍यांना मानधनाचे पैसे काढण्यासाठी धायरी, सिंहगड रोड अशा 30- 35 किलोमीटर अंतरावरील पोस्टात जावे लागते. त्यासाठी शंभर ते दीडशे रुपये व एक दिवस जात जात आहे.

टपाल कार्यालयात पुरेसे पैसे उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे आता पैशांचा तुटवडा निर्माण होणार नाही. त्यामुळे राजगड – तोरणागडाच्या डोंगर-दर्‍यातून येणार्‍या शेतकर्‍यांना गैरसोय दूर होणार आहे.
                                              -आनंद देशमाने, माजी जिल्हा परिषद सदस्य.

SCROLL FOR NEXT