पुणे

इंदापूर : पीएम किसान योजनेच्या अर्जांना अद्यापही मंजुरी नाही

अमृता चौगुले

शेळगाव; पुढारी वृत्तसेवा : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकर्‍यांसाठी सुरू केलेल्या पीएम किसान योजनेंतर्गत इंदापूर तालुक्यातील नव्याने शेतकर्‍यांकडून ऑनलाईन पध्दतीने भरलेल्या अर्जांना अद्याप मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत. त्या अर्जाना मंजुरी का आणि कशामुळे मिळालेली नाही, असे सवाल शेतकर्‍यांनी उपस्थित करून नाराजी व्यक्त केली. पीएम किसान योजनेंतर्गत इंदापूर तालुक्यातील शेतकर्‍यांना लाभ मिळत आहे.

परंतु, जे शेतकरी वंचित होते, त्या शेतकर्‍यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार तालुक्यातील हजारो शेतकर्‍यांनी अर्ज भरले. परंतु, त्या अर्जांना तहसील विभागाकडून कृषी विभागाकडून मंजुरी मिळते हे अद्यापही शेतकर्‍यांना माहिती नाही. त्यामुळे त्या नामंजूर अर्जांच्याबाबतीत विचारणा कोणाकडे करायची अशा प्रश्नदेखील या वंचित शेतकर्‍यांना पडला आहे.

सर्व कागदपत्राची पूर्तता करून ऑनलाईन अर्ज भरलेले असतानादेखील मंजुरी का देण्यात आली नाही, ते कोणत्या कारणामुळे अद्यापही मंजूर करण्यात आलेले नाहीत याचा खुलासा तहसील व कृषी विभागाकडून होणे गरजेचे आहे. त्वरित त्या हजारो अर्जांतील त्रुटींची पूर्तता करून मंजुरी देण्यात यावी, अशी मागणीदेखील वंचित शेतकर्‍यांकडून करण्यात आली आहे.

यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रूपनवर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, या अर्जांना मंजुरी देण्यासाठीचा लॉगिन पासवर्ड हा तहसील विभागाकडे आहे, त्यासंदर्भात कृषी विभागाकडे अद्यापही कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत, ते अधिकार तहसील विभागाकडे आहेत. या अर्जांमध्ये काही त्रुटी असतील, त्यामुळे त्या अर्जांना मंजुरी मिळाली नसेल, असेदेखील इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT