Pune Apmc Fruit Market Rates
पुणे : देशातील जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेश तसेच उत्तराखंड या पहाडी भागातील प्लम, पिच, चेरी आणि अॅप्रिकॉट या फळांचा हंगाम बहरला आहे. बाजारात या फळांची मोठ्या प्रमाणात आवक होत असून, कमी काळासाठी उपलब्ध असलेल्या या फळांना ग्राहकांकडून मागणी देखील चांगली असल्याने या फळांचे भावही चढे आहेत. तर, नासपती, पिअर या फळांची आवक पुढील आठवड्यात सुरू होणार असल्याची माहिती व्यापार्यांनी दिली. (Pune News Update)
मार्केट यार्डातील व्यापारी सुयोग झेंडे म्हणाले, दरवर्षी या फळांची आवक होत असते. ही फळे नाशवंत आहेत. बाजारात सध्या हिमाचल प्रदेश, काश्मीरमधून या फळांची आवक होत आहे. सुमारे महिनाभर पहाडी भागातील विविध फळे बाजारात उपलब्ध राहणार असून, हिमाचल प्रदेश येथील चेरीचा हंगाम अखेरच्या टप्प्यात आला आहे. आठ दिवस आवक राहणार आहे. तर काश्मीरमधील चेरीची चव महिनाभर चाखता येणार आहे. दोन्ही राज्यांतून ही फळे वाहनांसह विमानमार्गे मार्केट यार्डात विक्रीस येतात.
करवंद, जांभळाला आपल्याकडे ‘रानमेवा’ म्हटले जाते. त्याप्रमाणे उत्तराखंड, हिमाचल, काश्मीर या पहाडी भागांत पिअर, नासपती, प्लम, पिच ही फळे ‘रानमेवा’ म्हणून ओळखली जातात. ही सर्व फळे दर्जेदार असून, या फळांचा हंगाम जूनअखेरीस संपेल.सत्यजित झेंडे, फळांचे व्यापारी, मार्केट यार्ड
विमानमार्गे आलेली फळे एकाच दिवसांत येतात. त्यामुळे ती ताजी असतात. तुलनेने वाहतूक खर्चही जास्त असल्याने रेल्वे, रस्त्यामार्गे येणार्या फळांपेक्षा महाग असतात.
(आकडे एका खोक्याचे वजन आणि किलोचे दर)
प्लम 800 ते 1 हजार बॉक्स (4 किलो) 150 ते 200 रुपये
पिच 500 ते 600 बॉक्स (8 किलो) 125 ते 150 रुपये
हिमाचल चेरी 1200 बॉक्स (1 किलो) 350 ते 400 रुपये (विमान)
काश्मीर चेरी 1500 बॉक्स (1 किलो) 250 ते 300 रुपये (रस्ता, रेल्वे)
अॅप्रिकॉट 400 बॉक्स (2 किलो) 100 ते 125 रुपये