पुणे

बेल्हेनगरीतील रस्त्यांची प्रचंड दुर्दशा ! वाहतूक कोंडी नक्की संपणार कधी?

अमृता चौगुले

बेल्हे; पुढारी वृत्तसेवा : बेल्हे-जेजुरी महामार्गावरील रस्त्यावर काँक्रिटीकरणाचे स्वप्न बेल्हेकरांना दाखविले जात आहे. हे स्वप्न प्रत्यक्षात साकारेलही; पण मूळ प्रश्न वाहतूक समस्या सोडविण्याचा आहे. सद्य:स्थितीत या रस्त्याची प्रचंड दुर्दशा झालेली आहे. बेल्हेनगरीतील बेल्हे-जेजुरी रस्त्यावर ठिकठिकाणी होणारी कोंडी तात्पुरत्या उपाययोजना करून संपलेली नाही. त्यासाठी ग्रामपंचायत, वाहतूक पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभागाने एकत्रित व्यापक मोहीम राबविणे गरजेचे आहे; अन्यथा नव्याने मिळणार्‍या सुविधाही कुचकामी ठरतील.

बेल्हे-जेजुरी रस्त्यावर 24 तास मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. मुक्ताबाई चौक, पोळेश्वर चौक, बसस्थानकासमोर या तीन ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. मुक्ताबाईदेवी बाह्यवळण रस्तादुरुस्तीच्या कामामुळे दीपावलीच्या काळात बंद होता. त्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. गावातील तरुणांनी पुढाकार घेऊन तो रस्ता खुला केल्यानंतर काही प्रमाणात वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली.

सध्या बेल्हेनगरीत सकाळी व सायंकाळी वाहतूक कोंडी होत नसल्याचे दिसून आले. पण, रांजणगाव एमआयडीसीकडे जाणार्‍या जड वाहनांसाठी मार्ग उरले नसल्याने बेल्हेनगरीत वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ लागली. त्यावर काय उपाययोजना करायची? यावर मात्र एकाही यंत्रणेने अजून काही मत मांडलेले नाही.

मुक्ताबाईदेवी बाह्यवळण रस्त्याचे मजबुतीकरण व जागा असेल तिथे विस्तारीकरण नुकतेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मदतीने केले गेले. या अडचणींवर वाहतूक पोलिस, ग्रामपंचायत, महामार्ग प्रशासनाने अजूनही उपाययोजना केलेल्या नाहीत, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. या गोष्टींकडे आता लक्ष दिले गेले नाही, तर ओढ्याचा पूल (जेव्हा होईल तेव्हा) उभारणे सुरू झाल्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक कुठे वळवायची? याच मार्गावरून वाहतूक सुरू ठेवायची असल्यास त्याचे नियोजन काय?

संभाव्य निर्माणाधीन रस्त्यावरून कुठल्या वाहनांना परवानगी देणार? याबाबत आताच ठरवावे लागणार आहे; अन्यथा या रस्त्यावरील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढतच जाईल, यात शंका नाही. बेल्हे-जेजुरी रस्त्यावर पाणी साचू नये म्हणून 'ड्रेन' केले गेले. रस्ता चांगला झाला; पण साइडपट्ट्यांवर लावलेले गट्टू पादचार्‍यांसाठी नसून बिनधास्त अनधिकृत पार्किंगसाठी केल्याचे दिसून येते. रस्त्यावर चारचाकी वाहने नियमाची ऐशीतैशी करून लावली जातात. त्यामुळे बेल्हेनगरीत रस्त्यावरील कोंडीत भर पडत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT