किशोर बरकाले
पुणे: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (मनरेगा) आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 44 हजार 904 हेक्टर क्षेत्रावर फळझाडांची लागवड पूर्ण झाली आहे. मागील पाच वर्षांतील ही उच्चांकी लागवड असल्याची माहिती कृषी विभागाच्या फलोत्पादन संचालनालयातून देण्यात आली. त्यामध्ये आंब्याची सर्वाधिक लागवड झाली असून, ती 20 हजार 290 हेक्टरवर (45 टक्के) आहे.
मनरेगातून शेतकर्यांच्या सलग क्षेत्रावर, शेतीच्या बांधावर, पडीक जमिनीवर फळझाडे लागवड वाढविणे आणि शेतकर्यांच्या उत्पन्नवाढीस मदत करणे ही योजनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. त्यामध्ये दोन हेक्टर क्षेत्राच्या आतील शेतकरी आणि शासनाचे जॉब कार्ड धारण असलेल्या शेतकरी योजनेत सहभागासाठी पात्र आहेत.
राज्यात मनरेगा योजनेत आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 93 हजार 960 शेतकर्यांकडून सुमारे 75 हजार 830 हेक्टरवर फळझाडे लागवडीसाठी अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी तालुकास्तरावर तपासणीअंती 73 हजार 165 हेक्टर क्षेत्रावरील कामांना प्रशासकीय मान्यता दिली होती. त्यातून प्रत्यक्षात 44 हजार 904 हेक्टरवर नव्याने फळबाग लागवड पूर्ण झाली आहे.
मागील पाच वर्षांतील ही सर्वोच्च फळझाडे लागवड असल्याचेही सांगण्यात आले. वर्ष 2020-21 मध्ये 38 हजार 225 हेक्टर, 2021-22 मध्ये 43 हजार 779 हेक्टर, 2022-23 मध्ये 40 हजार 96 हेक्टर, 2023-24 मध्ये 38 हजार 973 हेक्टर तर 2024-25 मध्ये उच्चांकी 44 हजार 904 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड पूर्ण झाली आहे.
अधिकार्यांकडून शेतकर्यांना प्रोत्साहन
मनरेगातून फळझाडे लागवड वाढीसाठी कृषी विभागाचे फलोत्पादन संचालक डॉ. कैलाश मोते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हानिहाय नियोजन करण्यात आले. त्याची अंमलबजावणी फलोत्पादनचे कृषी उपसंचालक भागवत शिंगाडे, तंत्र अधिकारी प्रवीण कांबळे, कृषी अधिकारी प्रभाकर पवार, राजेश चव्हाण या चमूने केली आणि क्षेत्रीय स्तरावरील अधिकार्यांनी अधिकाधिक शेतकर्यांना फळझाडे लागवडीस प्रोत्साहित केल्यामुळे सर्वाधिक फळझाडे लागवडीस यश आल्याचे सांगण्यात आले.
हापूस आणि केशर आंब्यांचा समावेश
मनरेगातून फळझाडे लागवडीमध्ये शेतकर्यांकडून आंबा लागवडीस सर्वाधिक प्राधान्य आहे. त्यामध्ये प्रामुख्याने हापूस आणि केशर आंब्यांचा समावेश आहे. त्याखालोखाल केळी, संत्रा, डाळिंब, मोसंबी, सीताफळ लागवड केली गेली आहे. फळझाडेनिहाय झालेली लागवड : (क्षेत्र हेक्टरमध्ये) - आंबा 20290, केळी 7085, काजू 2659, चिकू 122, पेरू 626, डाळिंब 1405, संत्रा 2813, मोसंबी 1310, कागदी लिंबू 869, नारळ 798, सीताफळ 1160, द्राक्षे 262, गुलाब 197, मोगरा 48, निशिगंध 69, सोनचाफा 28, तुती 40 हेक्टर आणि बांबूची 4122 हेक्टरवरील लागवडीचा समावेश आहे.
राज्यात चालू वर्षी पाऊसमान चांगले राहिले. शासनाकडून रोपवाटिकांनाही अनुदान वेळेत मिळाले. त्यामुळे फळझाडे लागवडी साठी शेतकर्यांना कलमे-रोपांची उपलब्धता वेळेत झाली. मनरेगातून फळझाडे लागवडीच्या केलेल्या नियोजनात शेतकर्यांसह क्षेत्रीय स्तरावरील सर्व कृषी कर्मचारी, अधिकार्यांचा मोलाचा वाटा राहिला. त्यामुळेच फळझाडांसह मसाला पिके, फुले आदींची उच्चांकी 44,904 हेक्टरवर लागवड पूर्ण होऊ शकली आहे.- डॉ. कैलाश मोते, फलोत्पादन संचालक, कृषी आयुक्तालय, पुणे