पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : महानगरपालिका हद्दीमध्ये सर्व क्षेत्रिय कार्यालयअंतर्गत शनिवारी (दि. 29) महापालिकेचे सर्व क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विभागाने अतिक्रमणविरोधी धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये हातगाडी, टपरी, टेम्पो, फ्लेक्स, बॅनर, किऑक्स, जाहिरात बोर्ड व इतर साहित्य जप्त करण्यात आले. तसेच पत्राशेड निष्कासित करण्यात आले. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व क्षेत्रीय अधिकारी, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आली.
ही कारवाई सर्व क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण निरीक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बीट निरीक्षक), मजूर व इतर मनपा
कर्मचारी व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी तसेच पोलिस कर्मचारी व महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांचे जवान यांच्या सहाय्याने करण्यात आली. या कारवाईसाठी जेसीबी, ट्रक, डंपर, पिंजरा वाहने, क्रेन यांचा वापर करण्यात आला.
कृष्णानगर पोलिस लाईन परिसर, साने चौक परिसरात रोड, पदपथावर अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यात आली. यामध्ये 7 मोठया टपर्या, 2 बॅनर, 41 लहान टपर्या, 33 अनधिकृत ओटे, 13 हातगाडी, 5 लहान शेड, 600 चौ.फुटाचे 3 शेड तसेच साने चौक परिसरात 2 हजार 500 चौ. फुटाच्या पत्राशेडवर कारवाई करण्यात आली. जाधववाडी, कुदळवाडी आणि बोर्हाडेवाडी परिसरात 18 जाहिरात फलक, 2 हातगाड़ी, 3 टपरीवर कारवाई करण्यात आली.
मोशी टोल नाका ते भारतमाता चौक परिसर डुडुळगाव परिसर आणि चर्होली गाव परिसरात 9 हातगाड्या, 1 टपरी , 127 किऑक्स, 28 बॅनर हटविण्यात आले. वल्लभनगर परिसरात 11 टपर्या, 3 हातगाडी, 4 फ्लेक्स आणि 29 कीऑक्सवर कारवाई करण्यात आली.
काळेवाडी येथे 800 चौ.मी. अनाधिकृत पत्राशेड हटविण्यात आले. तर 1 हातगाड़ीं, 2 टपरी, 1 फ्लेक्स, 8 किऑक्सवर कारवाई करण्यात आली.
रहाटणी फाटा, डांगे चौक येथे झालेल्या अतिक्रमण कारवाईमध्ये 17 हातगाडी, 21 टपरी, 1 टेम्पो, 45 फ्लेक्स बॅनर, 302 किऑक्स, 27 जाहिरात बोर्ड, 31 दुकानासमोरील शेड काढण्यात आले. कुणाल आयकॉन रोड, जगताप डेअरी चौक, वाकड चौक व वाकड ब्रिज खाली असलेल्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच पिंपळे सौदागर-कुंजीर चौक येथे 4 पत्राशेडवर कारवाई करण्यात आली.
तीन चाकी 1 टेम्पो, 1 हातगाडी, 2 फ्लेक्स यावरही कारवाई करण्यात आली. सहाय्यक आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली कार्यालयीन अधीक्षक, 8 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, अतिक्रमण विभागाकडील मजूर 13 व महाराष्ट्र सुरक्षा बलाचे 14 जवान, 2 अतिक्रमण विभागाचे पोलिस कारवाईत सहभागी झाले होते.