पुणे

नवरा-नवरीच्या लग्नाचे फ्लेक्स लावण्याचे फॅड

अमृता चौगुले

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा :  ग्रामीण भागामध्ये सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. लग्नपत्रिका वेगवेगळ्या प्रकारे छापण्याचे एक नवीन फॅड असतानाच आता फ्लेक्स लावण्याची नवीन पद्धत सुरू झाली आहे. पूर्वीच्या लग्नपत्रिका अतिशय साध्या पद्धतीने कुटुंबातील सगळ्यांची नावे टाकून पत्रिका छापल्या जायच्या. आपल्या भावकीच्या लोकांची त्याच्यावर नावे टाकली जायची. आता मात्र पत्रिकेचे स्वरूपच बदलल्याचे पाहायला मिळते. लग्न जमल्यावर प्री-वेडिंग फोटोशूटचं आणखी एक नवीन प्रकार आता वाढीस लागला आहे. आता त्यात भर म्हणजे लग्न जमल्याचे नवरा-नवरीचे फ्लेक्स सगळीकडे लावणे हा एक प्रकार सध्या सगळीकडे नव्याने पाहायला मिळत आहे.

त्या फ्लेक्सवर नवरा-नवरीच्या शुभमंगलाची तारीख तर असतेच, शिवाय वरातीला डीजे कोणाचा बेंजो कोणाचा असाही आवर्जून उल्लेख केला जातो. म्हणजे जी मंडळी लग्नाला येणार नाही ती संध्याकाळी वरातीला हमखास असतातच. डीजे वाजवायला परवानगी जरी नसली, तरीदेखील रात्रीचे 10 नंतर अनेक ठिकाणी डीजेचा गोंगाट वरातीच्या दिवशी ऐकायला मिळतोच. नवरा-नवरीच्या लग्नाचे फ्लेक्स वेगवेगळ्या डिझाइनमध्ये लावले जातात. फोटोसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने शूट केले जातात. काही नवरा-नवरी ट्रॅक्टर चालवतानाचा फोटो लावतात, तर काहीजण बैलगाडी चालवतानाचा फोटो लावतात, काही एखाद्या टेकडीवर उभे राहिलेत अशा ठिकाणचा फोटो लावतात. काही मात्र चक्क साधू महाराज बनल्याचे फ्लेक्सवर फोटो लावतात.

जुन्या परंपरेला मिळतोय फाटा
लग्नाची जुनी परंपरा लोप पावत चालली असून, नवीन पद्धतीने लग्नसोहळे होत आहेत; परंतु पारंपरिक पद्धतीला फाटा देताना आपल्या संस्कृतीचा विसर पडणार नाही याबाबतची काळजी सगळ्यांनी घ्यायला हवी. मात्र, तसे होताना दिसत नाही. खेडोपाडीसुद्धा लग्नाच्या पद्धती आता बदलू लागल्या आहेत.

SCROLL FOR NEXT