वाल्हे : पुढारी वृत्तसेवा : पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील पुणे-मिरज लोहमार्गावर वाल्हे-निरा (ता. पुरंदर) दरम्यानच्या पिसुर्टी रेल्वे फाटक क्रमांक 27 येथे लोहमार्ग ओलांडने दुचाकीस्वारांना अवघड बनत चालले आहे. या ठिकाणी दुचाकी घसरून अपघात होण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. यात अनेक जण कायमचेच जायबंदी झाले आहेत. यासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडून अद्याप कोणतीही दखल घेतली नसल्याने दुचाकीस्वारांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. पिसुर्टी रेल्वे फाटकाजवळ लोहमार्गाचे दुहेरीकरण करण्यात आले. तेथे जुन्या रेल्वेरुळाचे घर्षण होऊन दुचाकी घसरत आहेत.
याच परिसरात अनेक लहान-मोठे खड्डे पडले आहेत. महामार्गापेक्षा जुना लोहमार्ग थोडा उंच तसेच लोहमार्गाजवळच रस्ता खराब झाल्याने दुचाकींच्या अपघातात वाढ होत आहे. बुधवारी (दि. 31) सकाळी एक ज्येष्ठ दुचाकीस्वार लोहमार्ग ओलांडताना त्यांची दुचाकी लोहमार्गावर अडकल्याने त्यांची तारांबळ उडाली होती. दुसर्या दुचाकीस्वारांच्या मदतीने त्यांची दुचाकी ढकलून काढावी लागली. दुचाकीवर दोन व्यक्ती असल्यास किंवा टायर खराब असल्यास हमखास अपघात होतो. अनेकदा दुचाकीस्वारांसह मागे बसलेले घसरून पडल्याने किरकोळ अपघात झाले आहेत.
रेल्वे फाटकावर उड्डाणपुलाची गरज
देखभाल दुरुस्तीसाठी पिसुर्टी रेल्वेगेट बंद ठेवण्यात येते. यामुळे वाहनचालकांना मोठा वळसा घालून जावे लागते. पुणे-पंढरपूर पालखी महामार्ग हा राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग होऊन आठ वर्षांहून अधिक काळ लोटला. दिवसभरात अनेकवेळा रेल्वे फाटक बंद राहत असल्याने वाहनचालक, प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या रेल्वे फाटकाजागी उड्डाणपूल होणे गरजेचे आहे. याबाबत अनेकदा मागणी करून देखील संबंधित प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येते.
खड्डे देताहेत अपघातांना निमंत्रण
यापूर्वीही याच रेल्वे फाटकाजवळ पावसाळ्यात दुचाकी घसरून अनेक अपघात घडले होते. त्या वेळी तात्पुरती उपायोजना म्हणून बारदाना (पोते) टाकल्याने दुचाकी घसरण्याच्या घटना कमी झाल्या. त्यानंतर आता या परिसरात अनेक लहान-मोठे खड्डे पडल्यामुळे दुचाकी अपघातांना निमंत्रण मिळत आहे. हे खड्डे तातडीने बुजविणे गरजेचे आहे.