ट्रिगरच दाबला गेला  file photo
पुणे

पिस्तूल लोड केले; मात्र ट्रिगरच दबला नाही ! वाचले तिघांचे प्राण

महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद

पुढारी वृत्तसेवा

तरुणाने आपली पत्नी व सासू-सासर्‍यांना मारण्यासाठी पिस्तूल लोड केले. परंतु, गावठी पिस्तूल असल्याने ट्रिगरच दाबला गेला नाही आणि पत्नीसह तिघांचे प्राण वाचले. पत्नीने प्रसंगावधान राखत पतीच्या हातातील पिस्तूल हिसकावण्याचा प्रयत्न केला. तिच्या मदतीला आई-वडीलही आले आणि त्यांनी पिस्तूल हिसकावून घेतले. ही घटना रविवारी (दि. 29 डिसेंबर) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील निघोजे येथे घडली. हरिष अशोक काकडे (वय 24, रा. शिवाजीवाडी, मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. याबाबत त्याच्या 21 वर्षीय पत्नीने महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने आपल्यासोबत मोशी येथे सासरी यावे, यासाठी आरोपी निघोजे येथे आला होता. त्याचे पत्नीशी भांडण झाल्यावर तिच्या हातातील मोबाइल त्याने खेचून घेतला. तू घरी चल नाहीतर येथेच तुला गोळी घालेल, अशी धमकी त्याने पत्नीला दिली. त्यानंतर आरोपी हरीष काकडे सासर्‍याला म्हणाला की, मला तुमच्याशी 10 मिनिटे बोलायचे आहे, असे म्हणत त्याने कमरेला खोचलेली पिस्तूल बाहेर काढून लोड केली. तुमच्या तिघांना मी ठेवत नाही, असे म्हणून पत्नीच्या दिशेने पिस्तूल रोखले. आरोपी काकडे याने ट्रिगर दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र गावठी पिस्तूल असल्याने त्याचा ट्रिगर दाबला गेला नाही. दरम्यान ही धक्कादायक घटना लक्षात येताच पत्नीने पतीवर झडप घालून त्याच्या हातातील पिस्तूल हिसकावण्याचा प्रयत्न केला. तिच्या मदतीला आई-वडिलही आले. त्या तिघांनी मिळून हरिष काकडे याच्या हातातून पिस्तूल हिसकावून घेतले. त्यानंतर आरोपी तेथून निघून गेला. दरम्यान तुम्ही जर पोलिसात तक्रार दिली तर मी दोन-तीन महिने जेलमध्ये जाईल; मात्र सुटून आल्यावर मी तुम्हाला सोडणार नाही, अशी धमकी त्याने सासर्‍याला फोन करून दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT